केंद्र सरकारने रेल्वे भाडेवाढीची घोषणा केल्यानंतर २५ जूनपूर्वी पास काढण्यासाठी प्रवाशांची धावपळ उडाली होती. तर दुसरीकडे पालिकेत भाडेवाढीवरून राजकारण तापले. या राजकारणात प्रवाशांचा प्रश्न बाजूला पडला आणि सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. भाडेवाढीला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांची पाठ थोपटून मनसेने भाजपला चिमटे काढले. हा प्रश्न पालिकेच्या अखत्यारित नसतानाही निषेधाच्या घोषणा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे भाडेवाढ करून प्रवाशांचे कंबरडे मोडल्याची टीका करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. आंबेरकर यांनी भाडेवाढीविरोधात केलेल्या निवेदनावर समाजवादी पार्टीचे नगरसेवक याकूब मेमन यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. पालिकेच्या अखत्यारित नसलेला भाडेवाढीचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस राजकारण करीत असल्याचा आरोप मेमन यांनी केला.