विविध आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य करणारे शरद राव राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुवातीला हवेहवेसे वाटत होते. मात्र, कामगार क्षेत्रातील अनुभवाचा पक्षाला फायदा करून देण्याऐवजी अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी पक्षातील नेत्यांवरही शरसंधान सुरू केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादीचा पदर धरायचा आणि आंदोलनाच्या मैदानात रिक्षावाल्यांचा कैवार घ्यायचा, अशी दुहेरी भूमिका जगणारे राव यांनी चालविलेली नेतेगिरी आता राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरू लागली आहे.
 म्युनिसिपल लेबर युनियनच्या माध्यमातून महापालिका, नगरपालिका कामगारांमध्ये करिष्मा निर्माण करताना शरद राव यांनी कामगार क्षेत्रातही दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या या लोकप्रियेतचा पक्षाला फायदा होईल म्हणून राष्ट्रवादीने त्यांना पक्षात मानाचे स्थान दिले, एवढेच नव्हे तर मागील विधानसभा निवडणुकीत गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली. मात्र कामगार क्षेत्रातील लोकप्रियतेचे मतांमध्ये रूपांतर करण्यात रावांना अपयश आले. अलीकडे तर, कोणत्याही मागणीच्या पूर्ततेसाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याच्या कार्यप्रणालीमुळे रावांचा दबदबा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे रावांच्या कामगार नेतेपदाचा पक्षाला कोणताच फायदा होत नसून उलट तेच पक्षाच्या माध्यमातून आपल्या संघटनेचा फायदा करून घेत असल्याची चर्चा आता राष्ट्रवादीत उघडपणे होऊ लागली आहे.
 मुंबई ऑटोरिक्षामेन्स संघटनेच्या माध्यमातून राव यांचे मुंबईतील रिक्षा संघटनांवर प्रभुत्व होते. मात्र रावांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून अनेक  नेत्यांनी वेगळ्या चुली मांडल्यामुळे रावांची ताकद क्षीण झाली आहे. त्यामुळे अस्तिव दाखवून देण्यासाठी ‘ऑटोरिक्षा मालक-चालक संघटना संयुक्त कृती समिती’च्या माध्यमातून राव यांनी पुन्हा एकदा ‘रिक्षा बंद’ची हाक दिली आहे. त्यांच्या या भूमिकेला आता राष्ट्रवादीकडूनच विरोध होऊ लागला आहे.

आधी मुख्यमंत्री, आता अहिरही..
रिक्षा आंदोलनाची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणाऱ्या राव यांनी या वेळी राज्यमंत्री सचिन अहिर यांनाही सोडले नाही. शरद राव यांच्या या मनमानीबद्दल काँग्रेसने राष्ट्रवादीकडे नाराजी व्यक्त केलीच, पण राव यांना वेळीच रोखले नाही तर ते पक्षालाच अडचणीत आणतील अशी तक्रार राष्ट्रवादीतीलच काहींनी वरिष्ठ नेत्यांकडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.