News Flash

पेंग्विनच्या मृत्यूचे स्थायी समितीच्या बैठकीत राजकारण

राजकीय पक्षांना उणीधुणी काढण्यात स्वारस्य

पेंग्विनच्या मृत्यूवरुन मुंबई महापालिकेत राजकीय पक्षांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. मंगळवारी बोलण्याची संधी न मिळालेल्या विरोधकांनी बुधवारी मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र यामध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसून आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व पेंग्विन परत दक्षिण कोरियात पाठवण्याची मागणी केली होती. यावरुन शिवसेनेने मनसेवर निशाणा साधला. ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे असणारा कुत्रा राज यांच्या पत्नीला चावला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी त्या कुत्राला सोडून दिले होते का ?’, असा प्रश्न शिवसेनेकडून मनसेला विचारण्यात आला. याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘पेंग्विन पक्षी आम्ही सांभाळू, इतरांनी आपला पक्ष सांभाळावा’, या शब्दांमध्ये मनसेला टोला लगावला होता.

उद्धव ठाकरेंनी पेंग्विनच्या मृत्यूवरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या मनसेवर शरसंधान साधले होते. ‘पनवती लोकांकडून पेंग्विनसंदर्भात टीका होते आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका’, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मनसेवर टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेच्या या टिकेला बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ‘आता पनवती दूर करण्यासाठी लिंबू-मिरची फंडही आकारा’, अशा शब्दांमध्ये मनसेने उद्धव ठाकरेंच्या टिकेला उत्तर दिले.

शिवसेना-मनसेसोबतच इतर पक्षांनीदेखील पेंग्विनच्या मृत्यूचे चांगलेच राजकारण केले. काँग्रेसने पेंग्विनच्या मृत्यूवरुन स्थायी समितीत शोक प्रस्ताव आणण्याची मागणी केली. तर समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी पेंग्विन अतिशय तणावाखाली होता, असे म्हणत अकलेचे तारे तोडले. ‘ताणतणावामुळे एका पेंग्विनचा मृत्यू झाला. आता इतर पेंग्विनवर किती ताण असेल’, असे समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी म्हटले.

पेंग्विनचा मृत्यू या अतिशय संवेदनशील विषयावरुनही फक्त राजकारण झाल्याचे चित्र स्थायी समितीच्या बैठकीत पाहायला मिळाले. पेंग्विनचा मृत्यू का झाला, इतर पेंग्विनच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाणार, त्यांची कोणत्या पद्धतीने देखभाल केली जाणार, अशी कोणतीही चर्चा स्थायी समितीच्या बैठकीत झाली नाही.

तीन दिवसांपूर्वी राणीच्या बागेतील एका हम्बोल्ट जातीच्या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला. १८ ऑक्टोबरपासून ही मादी पेंग्विन आजारी होती. तिची भूक कमी झाली होती आणि तिला श्वसनाचाही त्रास होत होता. यामुळेच या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला. यामुळे आता राणीच्या बागेत सात पेंग्विन आहेत. यामध्ये चार मादी आणि तीन नर पेंग्विनचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 5:13 pm

Web Title: politics over penguin death in mumbai municipal corporation
Next Stories
1 ‘पेंग्विनला मारून दाखवलं’ ; राष्ट्रवादीकडून सेनेविरोधात होर्डिंगबाजी
2 भाजपच्या गोटात आणखी एक मित्रपक्ष, जनसुराज्य महायुतीत सहभागी
3 आपण अजून ब्रिटीशांच्या काळातच आहोत का? ; कुपोषणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने सरकारला फटकारले
Just Now!
X