प्रदूषणाच्या पातळीत दिल्लीच्या जवळ जाणाऱ्या मुंबईला उत्तरेतील वाऱ्यांनी रोखले असले तरी सलग दुसऱ्या दिवशीही अंधेरीतील हवा श्वास घेण्यास अयोग्य ठरली. अंधेरीतील सूक्ष्म कणांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने हवेची प्रतवारी अत्यंत वाईट होती. शहरातील इतर उपनगरांमध्ये मात्र हवा समाधानकारक व वाईट या प्रतवारींमध्ये विभागली होती. मंगळवारी कुलाबा या एकमेव उपनगरात हवा शुद्ध होती.
मुंबईतील नऊ उपनगरांच्या हवेची प्रतवारी गेले सहा महिने मोजली जात असून, सोमवारी पहिल्यांदाच मालाड, अंधेरी, भांडुप व चेंबूर या चार उपनगरांमधील हवेची पातळी अत्यंत वाईट होती. उत्तरेतून आलेल्या वाऱ्यांमुळे हे प्रदूषक घटक शहरापासून दूर गेले व मंगळवारी हवेची प्रतवारी सुधारली. मात्र तरीही वाहनांची प्रचंड संख्या व वाहतूक कोंडीमुळे अंधेरीत २.५ मायक्रोमीटरपेक्षा सूक्ष्म व्यासाच्या सूक्ष्म धूलिकणांची (पर्टिक्युलेट मॅटर २.५ व १०) संख्या प्रति घनफुटामध्ये ३०० मायक्रोग्रॅमहून अधिक होती. मालाड, चेंबूर, बोरिवली तसेच माझगावमध्ये ही संख्या २०० ते ३०० मायक्रोग्रॅमदरम्यान तर भांडुप, बीकेसी व वरळी येथे १०० ते २०० मायक्रोग्रॅमदरम्यान राहिली. कुलाबा येथे मात्र हवेतील सर्व प्रदूषित घटक १०० मायक्रोग्रॅम या प्रमाणित पातळीपेक्षा कमी होते. वेधशाळा व पुण्यातील आयआयटीएम संस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या सफर प्रकल्पाअंतर्गत या नऊ उपनगरांमधील हवेची प्रतवारी ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड तसेच २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी (पीएम २.५) आणि २.५ ते १० मायक्रोमीटर व्यासाच्या सूक्ष्म धूलिकणांच्या (पीएम १०) प्रमाणावरून काढली जाते. मात्र उपनगरांमधील हवेची प्रतवारी खाली जाण्यासाठी सूक्ष्म धूलिकणच कारणीभूत ठरत आहेत.

पीएम २.५ ची पातळी (मायक्रोग्रॅम प्रति घनफूट)
बोरिवली – २३९, मालाड – ३००, अंधेरी – ३१४, बीकेसी – १७०
भांडुप – १७०,चेंबूर – २८० वरळी – ९८ ,माझगाव – २११, कुलाबा झ्र् ९३