मुंबई महापालिकेचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

भरतीच्या वेळी उसळणाऱ्या उंच लाटांसोबत समुद्रकिनारी येणाऱ्या कचऱ्याला मुंबईकरांचे बेजबाबदार वर्तन कारणीभूत असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. उघडय़ा पर्जन्यजल वाहिन्यांमध्ये मुंबईकरांकडून सर्रास फेकला जाणारा कचरा हेच या समस्येच्या मूळ  असल्याचेही पालिकेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

‘सिटीझन्स सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अ‍ॅण्ड एज्युकेशन’ या संस्थने अ‍ॅड्. शहनवाज नक्वी यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. समुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी तसेच कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत आवश्यक ते धोरण आखण्याचे आदेश पालिकेसह अन्य यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. १४ जुलै रोजी दुपारी आलेल्या भरतीच्या वेळी उंच लाटांमुळे मरिन ड्राइव्हसह मुंबईतील अन्य समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रातील ९ टन कचरा फेकला गेला. त्यात मरिन ड्राइव्ह परिसरातील कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक होते आणि हा कचरा उचलताना पालिका कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) योग्यरित्या राबवली जात नसल्याने प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठय़ा प्रमाणात समुद्रात सोडले जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत पालिका आणि पर्यावरण विभागाला याचिकेतील आरोपांवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. शिवाय ही समस्या उद्भवू नये म्हणून म्हणून काय उपाययोजना केल्या जात आहेत हेही स्पष्ट करण्यास बजावले होते.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करत या सगळ्या समस्येसाठी मुंबईकरच जबाबदार असल्याचा दावा केला. मुंबईत १०७ खुल्या पर्जन्यजल वाहिन्या आहेत. त्याद्वारे कचरा, सांडपाणी थेट अरबी समुद्रात सोडले जाते. उपनगर आणि विस्तारित उपनगरांमध्ये या खुल्या पर्जन्यजल वाहिन्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या आहेत. या  वाहिन्यांमध्ये सर्रास कचरा फेकला जातो. तसेच सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे हा कचरा आणि सांडपाणी कुठल्याही प्रक्रियेशिवाय थेट नाले, खाडी आणि समुद्रात जाते. एवढेच नव्हे, तर झोपडपट्टी परिसरातूनही या पर्जन्यजल वाहिन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा फेकला जातो. तोही थेट समुद्रात जातो. परिणामी समुद्रकिनारे आणि नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. परंतु पावसाळ्यात या सगळ्या समस्येमुळे मुंबई जलमय होऊ नये यासाठी पालिकेकडून नद्या, नाले आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खल्या पर्जन्यजल वाहिन्यांतील गाळ उपसण्यात येतो, असेही पालिकेने म्हटले आहे.