स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची दखल घेत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. तसेच मुंबईमधील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार याबाबतचा व्यवस्थापन आराखडा १५ सप्टेंबपर्यंत सादर करण्याचे आदेशही मंडळाने दिले आहेत. परिणामी मुंबईतील कचऱ्याची समस्या आणखी जटिल बनण्याची चिन्हे आहेत.
मुलुंड क्षेपणभूमीत टाकण्यात येणाऱ्या बेसुमार कचऱ्यामुळे आसपासच्या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. या संदर्भात स्थानिक रहिवासी, सामाजिक संस्था आणि खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. मुलुंड क्षेपणभूमीत अशास्त्रीय पद्धतीने कचरा टाकणे त्वरित थांबवावे, अशी सूचना मंडळाने राज्य सरकार आणि पालिकेला केली आहे. याठिकाणी प्रतिदिनी ६,५०० मेट्रिक टन कचरा टाकण्याची क्षमता आहे. मात्र येथे ११ हजार मेट्रिक टन कचरा टाकण्यात येतो. यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
मुंबईतील कचऱ्याची यापुढे कशा प्रकारे विल्हेवाट लावणार याबाबतचा व्यवस्थापन आराखडा तयार करावा आणि तो १५ सप्टेंबर २०१५ पर्यंत मंडळाला सादर करावा, असेही  सांगण्यात आले आहे.