प्रदूषणाच्या पातळी घातक ; अंधेरी, मालाडमध्ये परिस्थिती गंभीर

दिल्लीच्या पावलांवर पाऊल टाकत मुंबईच्या हवेच्या प्रदूषणाच्या पातळीनेही आता धोक्याची सूचना देण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मुंबईतील हवेची प्रतवारी फारच दयनीय असल्याचे ‘सफर’ या प्रदूषणमापक प्रकल्पाअंतर्गत नोंदविण्यात आले. हवेची प्रतवारी अंधेरी आणि मालाड परिसरांत सर्वात वाईट होती. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ही परिस्थिती आणखीनच बिघडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मंगळवारी मुंबईतील हवेच्या प्रतवारीचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) २५३ होता. बुधवारी तो ३०२ असा खालावला, तर गुरुवारी तो आणखी खालावून ३१२ वर आला. शुक्रवारी तो आणखी खालावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानामुळे प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भांडुप, मालाड, वरळी, बोरिवली, वांद्रे-कुर्ला संकुल आणि अंधेरी आदी भागांत सूक्ष्म धूलिकणांचे (पीएम-पर्टिक्युलेट मॅटर) प्रमाण ३०० मायक्रोग्रॅम प्रति घनफुटाहून अधिक झाले. हे प्रमाण १०० पेक्षा कमी असल्यास हवा शुद्ध मानली जाते. इतर भागांत हे प्रमाण कमी असणार आहे. यात चेंबूर, माझगाव या विभागांचा समावेश आहे. या प्रदूषित घटकांमुळे दमा, श्वसनविकाराच्या रुग्णांचा त्रास वाढतो. सामान्यांनाही श्वसनविकार होण्याची शक्यता वाढते.

थंडी गायब

गेले काही दिवस अधिकाधिक घसरणाऱ्या पाऱ्याने गेल्या काही दिवसांपासून उसळी मारली आहे. उत्तर-पश्चिमेकडून येणारे वारे दिवसा वाहत असल्याने आणि हवेतील आद्र्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात थंडी तात्पुरती गायब होणार असल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी सांताक्रुझ येथे किमान तापमान २१.४ अंश.से. व कमाल ३३.२ अंश से. तापमान नोंदवले गेले. त्यामुळे गेल्या आठवडय़ाप्रमाणेच कोरडय़ा हवेमुळे मुंबईतील किमान आणि कमाल तापमानातील फरक २० अंश से. इतका झाला आहे.