समीर कर्णुक

चरईत पालिकेच्या ठेकेदाराचा अजब कारभार; तलाव पाण्याने भरत असल्याने अडथळे

पावसाळा सुरू होण्याआधी नाले तसेच तलावांतील गाळ उपसा करून ते स्वच्छ करण्याची पद्धत असताना मुंबई महापालिकेने चेंबूर येथील चरई तलावाची चक्क पावसाळय़ात साफसफाई सुरू केली आहे. तलावातील गाळ उपसण्यापूर्वी तलावातील पाणी पंपाने उपसून बाहेर काढावे लागते. मात्र सध्या पाऊस सुरू असल्याने एकीकडे ठेकेदार पाण्याचा उपसा करत असताना दुसरीकडे, पावसामुळे तलाव पुन्हा भरत असल्याचे दिसून आले आहे.

चेंबूरमधील चरई तलावात मोठय़ा प्रमाणावर गणेशमूर्तीचे विसर्जन होते. याशिवाय अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. पालिकेकडून तलावाची देखभाल केली जाते. गणेश विसर्जनाला दोन महिने असताना पालिकेने तलावाच्या सफाईला सुरुवात केली आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच पंप लावून तलावातील पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर गाळ आणि अर्धवट विरघळलेल्या मूर्ती काढण्यात येणार होत्या. मात्र मुंबईत पावसाने जोर धरल्यामुळे तलाव पाण्याने पुन्हा भरला. आता पुन्हा या ठिकाणी पंप लावून पाणी काढावे लागणार आहे.

दरवर्षी पालिकेकडून अशाच प्रकारे भर पावसाळ्यात तलावाची सफाई केली जाते. त्यावर ३० ते ४० लाख रुपये खर्च केले जातात. मात्र भर पावसात हे काम काढले जात असल्याने तलावाची स्वच्छता नीट होतच नाही, कारण तलाव पुन:पुन्हा पाण्याने भरत असल्याने, कंत्राटदार अर्धवट सफाई करून पळ काढत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

तलावावर अनेकदा अनाठायी खर्च

केवळ गाळ उपसण्यासाठीच नव्हे तर या तलावावर आतापर्यंत अनेक वेळा अनाठायी खर्च केला गेला आहे. पाच वर्षांपूर्वी पालिकेने अडीच कोटी रुपये खर्च करत तलावाभोवती संरक्षण भिंत बांधली. मात्र काही दिवसांतच ती तोडून टाकण्यात आली. इथल्या एका विकासकाच्या इमारतीकडे जाणारा रस्ता रुंद करण्याकरिता ती तोडण्यात आल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. त्यानंतर पुन्हा दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करत पालिकेने गणेश घाट आणि तलावाच्या बाजूच्या परिसराचे सुशोभीकरण केले. विजेचे दिवे लावले. मात्र आजपर्यंत येथील एकही दिवा सुरू झालेला नाही, तर काही दिवसांपूर्वीच या तलावाचे मुख्य प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत असताना ते तोडून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या निधीतून पुन्हा डागडुजीचा घाट घातला. आताही तलावासाठी तयार करण्यात आलेले लोखंडी गेट तलावाजवळ पडून आहे, तर तलावात कारंजे बसविण्याकरिता आणलेले लाखो रुपयांचे साहित्य याच ठिकाणी धूळ खात पडून आहेत.