एका मागोमाग होणारे अपघात, विस्कटलेले वेळापत्रक, तांत्रिक अडचणी यामुळे गेले काही महिने ग्रस्त असलेल्या मध्य रेल्वेवरील गंडांतर दूर व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी नवग्रहांना साकडे घातले आहे. गेल्या शनिवारी सीएसएमटी येथे विभागीय व्यवस्थापकीय कार्यालयात भटजी बोलवून नवग्रहांची शांती-पूजा करण्यात आली. यावरून मध्य रेल्वे प्रवासी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेवर टीका केली आहे.

गेले महिनाभर मध्य रेल्वे या ना त्या कारणाने अडचणीत येत आहे. पुण्याजवळ दोन मालगाडय़ा रुळावरून घसरल्या. तर कार्यालयीन वेळेत मेगाब्लॉकचे वेळापत्रक लागू करण्यात आल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. यावर रेल्वेने उपाय योजला तो नवग्रह शांतीचा. सीएसएमटी येथे शनिवारी आयोजित केलेल्या नवग्रह पूजेसाठी सुनील शास्त्री या पुजाऱ्याला बोलावण्यात आले होते. काही ग्रहांची वक्रदृष्टी असून त्यांची शांती करण्यासाठी पूजा आयोजित करण्यात आल्याचे शास्त्री यांनी सांगितले आहे. या पूजेला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मध्य रेल्वेच्या या कर्मकांडावर प्रवासी संघटनांनी टीका केली आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या उपाध्यक्ष लता अरगडे यांनी ही तर अंधश्रद्धा असल्याचे सांगितले. तांत्रिक समस्या सोडवण्याऐवजी रेल्वे प्रशासन पळवाट शोधत आहे. पूजेला विरोध नाही. मात्र ज्या गोष्टीसाठी केले जात आहे, ते चुकीचे आहे. यातून काहीही साध्य होणार नसल्याचे त्या म्हणाल्या. रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनीही पूजेला विरोध नसल्याचे सांगितले. मात्र त्यामागील जे कारण आहे ते चुकीचे आहे. लोकल वेळापत्रक कसे सुरळीत राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यासाठी नवग्रहासारखी पूजा घालणे ही अंधश्रद्धाच आहे व अवैज्ञानिकच आहे. डब्यांमध्ये बंगाली बाबांच्या पत्रकांविरोधात कारवाई करणाऱ्या रेल्वचे हे कृत्य चुकीचे आहे.

– नंदकिशोर तळाशिलकर, राज्य प्रधान सचिव, अंनिस

कार्यालयात पूजा होत असतात. त्यात काही नवल नाही आणि ती पूजा रेल्वे वेळापत्रक वैगरे सुधारण्यासाठी नव्हती.

– सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे