उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात अटीतटीची लढाई आहे, मी जागा गमावणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात, प्रसिद्धीमाध्यमांमध्ये झाली, निवडणूक सर्वेक्षणातून तसे वर्तविले गेले. पण मी न डगमगता ठामपणे लढले. केंद्र व राज्य सरकारची कामगिरी, मी गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी केलेली विकासकामे आणि भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष या महायुतीचे कार्यकर्ते यांची मेहनत यामुळे मला विजय संपादन करता आला, असे प्रतिपादन खासदार पूनम महाजन यांनी लोकसत्ताशी बोलताना केले.

या निवडणुकीत कोणती आव्हाने होती व त्याचा कसा मुकाबला केला, असे विचारता महाजन म्हणाल्या, काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून मी २०१४ मध्ये १. ८७ लाख मतांनी मी निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा, महापालिका निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा विचार केला, तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा ती अधिकच होती. युतीच्या मतांमध्ये वाढ करणे आणि नवमतदारांचा पाठिंबा मिळविणे, यासाठी पावले टाकली. शेवटी निवडणूक ही एक परीक्षाच असते. आणि अभ्यास कितीही केला असेल तरी कोणताही पेपर सोपा कधीच नसतो. माझ्यासाठी भाजयुमो आणि युतीच्या कार्यकर्त्यांनी हा पेपर सोपा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सरकारच्या योजना, कामे आणि मी गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम माझ्या कार्यकर्त्यांनी मनापासून केले. निवडणूक जाहीर झाल्या दिवसापासून त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. माझ्या मतदारसंघातही विविध प्रांतांमधून आलेले लोक राहतात. युवा मोर्चाच्या त्या त्या भागांतील कार्यकर्त्यांनी माझ्या येथे येऊन त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधत योजनाबद्ध प्रचार केला.

विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यासाठी माझी अद्ययावत वॉर रूम तत्पर होती. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सएपच्या माध्यमातून मी आणि माझे सोशल मीडिया कार्यकर्ते विरोधकांचे सगळे मुद्दे खोडून काढत होते.

मी केलेल्या विकासकामांची उजळणी करत होते. विरोधकांच्या पाच वर्षांच्या निष्क्रियतेची जाणीव करून देत होते. जनतेसमोर ज्यावेळी मी संपर्कासाठी जात होते त्यावेळी प्रत्येक ठिकाणी लोकांनी माझे प्रेमाने स्वागत केले. अवघड वाटणारा हा पेपर या सगळ्यांच्या जोरावर सोपा होऊन गेला. मतदारांनी माझ्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि मी १.३० लाख मताधिक्याने निवडून आले, असे महाजन यांनी सांगितले.

‘पीपीपी तत्वानूसार काम’

पुढील पाच वर्षांत कोणती कामे करण्याचे नियोजन आहे, असे विचारता पूनम महाजन म्हणाल्या, सरकारच्या प्रत्येक योजनेचा फायदा मतदारसंघातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे. माझ्या पब्लिक पॉलिटीशीयन पार्टनरशिप (पी पी पी) तत्वानुसार नागरिकांच्या विविध समस्या सोडविणार आहे. विमानतळ झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याचा निर्णय झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणार आहे. संरक्षण खात्याच्या जमिनीवर असलेल्या रहिवाशांच्या घराच्या प्रश्नाबरोबरच इतरांच्याही घरांचे व अन्य प्रश्न सोडविण्यावर मी भर देणार आहे. गेल्या पाच वर्षांतही त्याच दृष्टीने काम केले.  माझ्या मतदारसंघात बीकेसीत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र व बुलेट ट्रेन स्थानक होणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांची व प्रकल्पांची कामे जलदगतीने होण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे महाजन यांनी स्पष्ट केले.