News Flash

‘व्हिवा लाऊंज’मध्ये पूनम महाजन यांच्याशी गप्पा

राजकारणातील स्त्रिया हा नेहमीच औत्सूक्याचा विषय असतो.

खासदार पूनम महाजन

राजकारणातील स्त्रिया हा नेहमीच औत्सूक्याचा विषय असतो. तरुण वयात खासदार म्हणून राजकारणात वावरताना स्वत:ची ओळख, आवडनिवडही जपणे ही तारेवरची कसरत असते मात्र पूनम महाजन यांना ती लीलया साधली आहे. ‘महाजन’ नावाची पुण्याई पाठीशी घेऊन पूनम महाजन राजकारणात उतरल्या खऱ्या, पण पाहता-पाहता आपल्या खास कार्यशैलीने त्यांनी  राजकारणात आपल्या नावाचा ठसा उमटवला. आज भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपदही त्या हिरीरीने सांभाळत आहेत. ज्या आणीबाणीच्या क्षणी त्यांनी राजकारणात प्रवेश केला तो क्षण ते खासदार म्हणून झालेला त्यांचा प्रवास १७ नोव्हेंबरला केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मधून उलगडणार आहे.

राजकारणाचे बाळकडू लहानपणापासून मिळाले असले आणि अगदी वारसाहक्काने या क्षेत्रातील वाटचाल पक्की झाली असली तरी तिथे भक्कमपणे पाय रोवून उभी राहण्याची आपली क्षमता ज्याची त्यालाच सिध्द करावी लागते. ‘भाजप’चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर अचानकपणे राजकारणाची सूत्रे हातात आलेल्या पूनम महाजन यांनीही गेल्या दहा वर्षांत पक्षप्रवेश ते खासदारकीपर्यंतचा प्रवास स्वबळावर करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१० साली ‘भारतीय जनता युवा मोर्चा’च्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. जास्तीत जास्त तरुण मतदारांना ‘भाजप’कडे वळवण्यासाठी जे प्रयत्न केले गेले त्यात पूनम महाजन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आज त्या ‘भारतीय जनता युवा मोर्चा’च्या अध्यक्ष आहेत.

२०१४ साली उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली. या भागात वर्षांनुवर्ष मतदारांवर गारूड करून असलेल्या प्रिया दत्त यांचा प्रचंड मताने पराभव करत त्यांनी भाजपकडे विजयश्री खेचून आणली. केवळ राजकारणीच नव्हे तर ‘प्राणीमित्र’ अशीही त्यांची वेगळी ओळख आहे. राजकारणी म्हणून हाती असलेले नेतृत्व सांभाळतानाच आपल्या अन्य सामाजिक जबाबदाऱ्या आणि दोन मुलांची आई म्हणून असलेली कौटुंबिक जबाबदारीही त्या सहजतेने पार पाडत आहेत.

त्यांचा हा राजकीय-सामाजिक प्रवास, या प्रवासादरम्यानचे संघर्षांचे क्षण, त्यांना आलेले विशेष अनुभव, त्यांची मते, त्यांचे काम आणि त्यामागे उभा असलेला वारसा..याविषयी पूनम महाजन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत जाणून घेण्याची संधी ‘व्हिवा लाऊंज’मधून मिळणार आहे. ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ हे या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर आहेत.

  • कधी : शुक्रवार, १७ नोव्हेंबर, संध्याकाळी ५.३० वाजता
  • कुठे : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर.
  • प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
  • काही जागा राखीव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:49 am

Web Title: poonam mahajan in loksatta viva lounge
Next Stories
1 करी रोड पादचारी पुलाचा मार्ग बदलणार
2 ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर नाटय़कलेचे मर्म उलगडणार!
3 रेल्वेतील कंत्राटदार कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारींमध्ये वाढ
Just Now!
X