राजकीय युतीमध्ये चढ-उतार होत असतात. दोन स्वतंत्र घटक एकत्र येतात तेव्हा त्या नात्यात काही चढ-उतार होणे स्वाभाविकच आहे, ते पूर्वीही होते; तरीही भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत कारण आमची विचारधारा एक आहे, असे प्रतिपादन खासदार पूनम महाजन यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावरून केले.

‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या या कार्यक्रमात सामान्य कार्यकर्ती ते भाजयुमोच्या अध्यक्ष आणि खासदार इथपर्यंतचा महाजन यांचा राजकीय प्रवास उलगडला. तसेच वडील प्रमोद महाजन यांचा राजकीय वारसा पुढे नेणारी त्यांची कन्या, नृत्य-नाटक आणि खेळातही मुशाफिरी करणारी एक जिद्दी तरुणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी स्त्री; अशी महाजन यांची विविध रूपेही वाचकांसमोर आली. जनकल्याण सहकारी बँक ही या कार्यक्रमाची बँकिंग पार्टनर होती.  ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक दिनेश गुणे आणि रेश्मा राईकवार यांनी महाजन यांच्याशी संवाद साधला.

युतीच्या मुद्दय़ावर महाजन म्हणाल्या की, ‘‘युती ही दोन प्रकारची असते. पारिवारिक युती आणि राजकीय युती. आमच्यातील पारिवारिक युती ही कायमच घट्ट आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांची कौटुंबिक जवळीक कायमच आहे. कालौघात राजकारणाचे स्वरूप बदलले आहे. संयम कमी झाला आहे. असे असूनही आणि आकडय़ांच्या खेळ वाढला असला तरीही काही नाती कधी बदलत नाहीत.’’

‘‘प्रमोद महाजन या नावाचा करिश्मा आजही राजकारणात आहे आणि त्याचा अनुभव नेहमी येत असतो. ते गेल्यावर आता त्यांचे काम, त्यांचे मोठेपण कळते आहे. आमच्यासाठी ते फक्त आमचे ‘बाबा’ होते. घरात राजकीय वातावरण होते, मोठय़ा नेत्यांची ऊठ-बस होती. पण तेव्हा माझी भूमिका ही फक्त आईला मदत करणे एवढीच असायची. तरीही नकळत मी त्यांना पाहत शिकत होते आणि त्याचा आज उपयोग होतो. प्रमोदजींची मुलगी म्हणून लोकांच्या अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. त्यांचा काही प्रमाणात ताणही असतोच. मी त्या पूर्ण करते का माहित नाही पण प्रामाणिकपणे प्रयत्न करते आहे,’’असेही महाजन यांनी प्रांजळपणे सांगितले. केसरीचे टूर्सचे केसरी पाटील, सुनीता पाटील, जनकल्याण सहकारी बँकेचे संतोष केळकर या कार्यक्रमास उपस्थित होते.

महाजन उवाच..

  • राजकारण आल्यावर महिलांनी काही तरी वेगळे दिसावे, ठरावीक ढाच्याचे कपडे घालावेत असे कशासाठी? राजकारणातील महिलांनी छान राहावे, दिसावे यात वावगे काहीच नाही.
  • स्त्री-पुरुष समानता म्हणजे स्त्रीने पुरुषासारखे वागावे असे नाही. प्रत्येकाची आपापली ओळख आणि कामे आहेत ती सक्षमपणे निभावणे आवश्यक आहे. त्यातही अमुक काम स्त्रीचे किंवा पुरुषाचे असेही नसते. ज्याला जे जमते ते त्याने करावे. महिलेच्या जबाबदाऱ्या अधिक असतात. त्या तिला पूर्ण कराव्याच लागतात, त्यात सोपे, अवघड, आवडीचे- नावडीचे असा प्रश्नच नसतो.
  • वेळ मिळत नाही हे थोतांड आहे. वेळेचे नियोजन करता येतेच.
  • राजकारण म्हणजे फक्त निवडणुकीचे राजकारण नाही. त्यात अनेक कामे येतात आणि त्यात उत्तम करिअर करता येऊ शकते.
  • विद्यार्थ्यांच्या निवडणुका असाव्यात. मुलांना संधी मिळते आणि त्यांना व्यवस्थेतील अनेक गोष्टी शिकता येतात.