05 December 2020

News Flash

सोने खरेदीत घट

भावातील तेजीमुळे ग्राहकांचा निरुत्साह

भावातील तेजीमुळे ग्राहकांचा निरुत्साह

मुंबई :  दसरा सणानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सराफा दुकानात ग्राहकांची रविवारी लगबग होती, मात्र करोनाचे संकट आणि दुसरीकडे सोन्याच्या भावातील तेजीमुळे सोने खरेदी ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मागणी काहीशी घटली आहे.

गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी सोन्याचे दर प्रति तोळा ३८ हजार रुपये होते, तर यंदा ते वाढून ५१ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. सोन्यातील भाववाढीमुळे ग्राहकांचेही गणित कोलमडले आहे. त्यामुळे मोठे हार, दागिने खरेदीऐवजी छोटे दागिने खरेदीकडे ग्राहकांनी मोर्चा वळविला आहे. तसेच करोनाचा धोका टळला नसल्याने भविष्याची चिंताही अद्याप दूर झाली नाही. भाव वाढल्याने एवढी गुंतवणूक अनेकांना शक्य होत नसून, याचा परिणामही खरेदीवर जाणवत असल्याचे सराफा दुकानदार सांगतात.

सोन्याचा दर वाढल्याने सोन्याचे हार, मोठे दागिने करण्याआधी ग्राहकांकडून विचार केला जात आहे. मात्र सोन्याची नाणी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.  बाजारातील मागणी घटलेली असून यंदा दसऱ्याला २५ टक्के च प्रतिसाद असल्याचे, दादर येथील एम. व्ही. पेंडूरकर आणि कंपनीचे अजित पेंडूरकर यांनी सांगितले. तर ‘करोना, टाळेबंदी, नोकरकपात आदींचा परिणाम अनेकांवर झाला. त्यातच सार्वजनिक वाहतूक मर्यादित असल्याने दादरमधील दुकानात खरेदीसाठी येण्यात ग्राहकांना अडचणी होत्या. सध्या ग्राहकांकडून ३ ते ८ ग्रॅम वजनापर्यंतच्या आणि ३० ते ४० हजार बजेटमधील दागिन्यांना मागणी असल्याची माहिती मंगलमूर्ती ज्वेलर्सचे दीपक देवरुखकर यांनी दिली.

‘दसऱ्याच्या मुहूर्तावर लोक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. पुढे लग्न मुहूर्त आहेत. त्यामुळे या लग्नसमारंभाच्या निमित्तानेही काही ग्राहक ‘आगाऊ नोंदणी’ (प्री बुकिंग) करत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने महिलांकडून ‘लाईट वेट’ दागिन्यांना चांगली मागणी आहे. दसऱ्यानिमित्त मुंबईसारख्या महानगरांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ५० ते ६० टक्के  प्रतिसाद आहे. तर छोटी शहरे आणि ग्रामीण भागातून मागणी चांगली असून गेल्या वर्षीची विक्रीची पातळी गाठली जाईल,’ अशी माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) संचालक आणि पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी दिली.

उत्साह का आटला?

’  सोन्याचे दर प्रति तोळा ३८ हजार रुपये होते, तर यंदा ते वाढून ५१ हजार

’  सोन्यातील भाववाढीमुळे ग्राहकांचेही गणित कोलमडल

’ मोठे हार, दागिने खरेदीऐवजी छोटे दागिने खरेदीकडे ग्राहकांचा मोर्चा

’ करोनाचा धोका टळला नसल्याने ग्राहकांना भविष्यातील खर्चाची चिंता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 2:19 am

Web Title: poor gold sales on dussehra zws 70
Next Stories
1 पोलीस सुरक्षा नियम कागदावरच!
2 Coronavirus : रुग्ण दुपटीचा कालावधी १२६ दिवसांवर
3 जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रस्ताव
Just Now!
X