‘हॅलो ब्रदर’, ‘जोरू का गुलाम’, ‘हंगामा’ यांसारख्या विनोदी चित्रपटांतून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडलेले बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते रझाक खान यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. मुंबईत त्यांच्या राहत्या घरी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. वांद्रे येथील ‘होली फॅमिली’ रुग्णालयात त्यांना नेण्यात आले पण तेथे दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

रझाक खान आपल्या विनोद शैलीतील संवादांसाठी प्रसिद्ध होते. आजवर त्यांनी अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे.  ‘जोरु का गुलाम’, ‘हॅलो ब्रदर’, ‘क्या कूल है हम’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘रुप की राणी चोरो का राजा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. १९९३ पासून ते चित्रपटात काम करत होते. आजवर त्यांनी ९० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. २०१४ साली कपिल शर्मा याच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या टेलिव्हिजन कार्यक्रमात देखील त्यांनी उपस्थिती लावली होती.

उद्या दुपारी चार वाजता मुंबईत रझाक खान यांचा अंत्यविधी होणार आहे.