ललित

साहित्यिक घडामोडींचा बातमीदार म्हणून ५३ वर्षे अव्याहत दर्जेदार अंकांची परंपरा देणाऱ्या ललितमध्ये यंदा ‘कथा, कादंबरी, कविता आदी सर्जनशील साहित्याची स्थितीगती’ ही लेखमाला आहे. मोनिका गजेंद्रगडकर, श्रीराम शिधये, संजय भास्कर जोशी आणि रमेश राठिवडेकर या मान्यवरांनी चौकस नजरेतून या विषयाची अनेक रूपे मांडली आहेत. गोविंद तळवलकरांनी शेक्सपिअरवर, वसंत अबाजी डहाके यांनी मंगेश नारायणराव काळे यांच्यावर, आशा बगे यांनी आनंद विनायक जातेकर यांच्यावर लिहिलेले लेख वाचनीय आहेत. लीला दीक्षित यांनी लिहिलेला नवनीतवरील लेख उद्बोधक ठरावा. कृष्णचंदर या हिंदीतील श्रेष्ठ लेखकाच्या लेखन कारकिर्दीचा चंद्रकांत भोंजाळ यांनी परामर्श घेतला आहे. याशिवाय अनंत देशमुख, संजीवनी खेर आदी लेखकांचे वाचनप्रेरणा जागवणारे लेख अंकामध्ये आहेत.

  • संपादक – अशोक कोठावळे, किंमत – १२० रुपये

 

युगांतर

नेहमीप्रमाणे ‘युगांतर’चा विशेष दिवाळी अंक या वेळेसही विविध लेखांनी समृद्ध आहे. भांडवलशाहीची सध्याची अवस्था ही विनाशाकडे चालली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. व त्या दृष्टीकोनातून संजीव खांडेकर यांनी ‘ऋतुसंहाराचा काळ : अर्थात भविष्याचा बर्फखडा’ या लेखाद्वारे मांडणी केली आहे. जयदेव डोळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कादंबऱ्यांत आलेले वर्णन वाचकांसमोर आणले आहे. तर पॅरिस येथे पर्यावरणासंबंधीच्या जागतिक परिषदेला हजर राहणारे अतुल देऊळगांवकर यांनी पर्यावरणाच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. नवीन आर्थिक धोरणाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा आढावा माधव दातार, श्रीनिवास खांदेवाले यांनी घेतला आहे.

  • संपादक- डॉ. भालचंद्र कानगो, किंमत- १०० रुपये

 

शब्दमल्हार

शब्दमल्हार दिवाळी अंकात सृजनसंवाद, संभवाक्षरे आणि सहजीवन हा त्रिबंध सादर करण्यात आला आहे. प्रकाश किरणांसारखा विचार किरणांचा प्रकाश प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पडावा, जे आहे त्यापेक्षा अधिक समृद्ध जगता यावे, कलेचे आणि जीवनक्षणांचे नाते असावे त्यातून सुख आनंदाच्या, तर दुख अनुभूतीच्या पातळीवर जाऊन त्याचा निर्मितीशी संवाद व्हावा हा हेतू ठेवून ख्यातनाम कन्नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा आणि जगद्विख्यात तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांच्याशी साधलेला संवाद वाचकांसमोर मांडण्यात आला आहे. कृष्णात खोत यांची कादंबरी ‘संभवाक्षरे’मध्ये देण्यात आली आहे. तर सहजीवनमध्ये सुरेश तळवळकर/पद्मा तळवळकर, उमा कुलकर्णी/विरुपाक्ष कुलकर्णी, रेखा बैजल/ शिवकुमार बैजल  यांच्या मुलाखती देण्यात आल्या आहेत.

  • संपादक – स्वानंद बेदरकर, किंमत – १३० रुपये

 

जलोपासना

देशासह संपूर्ण जगासमोरचा कळीचा मुद्दा म्हणजे पाणी-प्रश्न. या प्रश्नाचा सर्व अंगांनी आढावा घेण्याचा प्रयत्न जलोपासना या दिवाळी अंकाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. या अंकातील लेख वाचताना पाणी विषयाचे विविध पदर उलगडून दाखवल्याचे आपल्या लक्षात येईल. पाण्याशी निगडित काही संस्था व व्यक्ती यांचा परिचयसुद्धा या अंकाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. पाण्याशी निगडित व्यंगचित्रांमुळे अंक वाचायला आणखी मजा येते. पाणी व्यवस्थापनावर फक्त आदर्शवादी विचार न मांडता करता येण्याजोग्या उपाययोजना या अंकाच्या निमित्ताने लेखकांनी मांडल्या आहेत. प्रत्येक लेखकाने त्याचे म्हणणे रोचक शब्दात मांडल्याने अंक  संग्राह्य झाला आहे.

  • संपादक- डॉ. दत्ता देशकर, श्रीधर खंडापूरकर, किंमत -१२५ रुपये