समाजमाध्यमांवरील संवादातून बाब उघड
मुंबई : अश्लील चित्रफीत प्रकरणात अटक केलेल्या व्यावसायिक राज कुंद्रा याचे व्हॉट्सअप संवाद समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहेत. पोलीस कारवाईच्या भीतीने राज कुंद्राने आधीच पर्यायी योजना केल्याचे या संवादातून समोर येत आहे. त्यातून ‘हॉटशॉट्स’ हे अ‍ॅप रद्द केले तरी अन्य माध्यमातून अश्लील चित्रफितींचा व्यवसाय सुरूच ठेवण्याचा प्रयत्न कुंद्राकडून सुरू असल्याचे समोर येत आहे.

अश्लील चित्रफिती प्रकाशित करून ‘गूगल प्ले स्टोअर’ या अ‍ॅप्लिकेशनच्या नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे ‘हॉटशॉट्स’ हे अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे या चित्रफिती अन्य माध्यमातून प्रसारित करण्यासाठी कुंद्राने आधीच योजना तयार केल्याचे समोर येत आहे.

कुंद्रा सहभागी असलेल्या ‘एच अकाउंट्स’ या व्हॉट्सअप समुहामधील संवादातून हे समोर आले आहे. नियमावलीचा भंग केल्यामुळे ‘हॉटशॉट्स डिजिटल’ हे अ‍ॅप रद्द करण्यात येत असल्याचा ई-मेलद्वारे मिळालेला संदेश एका सदस्याने ग्रुपमध्ये प्रसारित केला. त्यानंतर व्हॉट्सअपवरील संवादात हा नवा पर्याय २ ते ३ आठवड्यांत कार्यान्वित होऊन नवीन अ‍ॅप हे ‘अँड्रॉईड’ आणि ‘आयओएस सिस्टम’ यांच्यावर येईल, असे कुंद्रा सांगताना दिसत आहे.

दरम्यान, यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केलेल्या चित्रफितीतील अश्लील भाग वगळण्याबाबतही त्यांच्यात या समुहामध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसते आहे. त्याचबरोबर ‘एच अकांऊंट्स’ ग्रुपवर आर्थिक उलाढालीची चर्चाही सुरू असल्याचे संवादातून समोर येत आहे.