फेब्रुवारीमध्ये उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट बनवणाऱ्या रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी काही दिवसांपासून उद्योगपती राज कुंद्रा याला अटक केली. कुंद्राच्या अटकेनंतर पोलीस प्रकरणाचा तपास करत असून, आता या प्रकरणात आणखी एका मनोरंजन कंपनीच्या संचालकांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलं आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून आर्म्सप्राईम मीडिया प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे संचालक सौरभ कुशवाह यांची चौकशी केली जाणार आहे.

पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठसह इतर काही जणांवर कारवाई केल्यानंतर मुंबई पोलिसांनी उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. राज कुंद्रा याला अटक करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, राज कुंद्रा पॉर्न चित्रपट निर्मितीमध्ये मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे असल्यानं अटक करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केला जात असून, आता गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने आर्म्सप्राइम मीडिया प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे संचालक सौरभ कुशवाह यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. तसं समन्स कुशवाह यांना प्रॉपर्टी सेलकडून बजावण्यात आलं आहे. या पॉर्न रॅकेट प्रकरणात कुशवाह यांची चौकशी होणार असल्यानं गुढ वाढलं आहे.

राज कुंद्रा अटकेनंतर २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत होता. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरण उघडकीस आल्यानंतर सेबीनेही राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीसह चार जणांना कंपनीच्या व्यवहारात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. तर ईडीही या प्रकरणात राज कुंद्राविरुद्ध फेमा (Foreign Exchange Management Act) नुसार गुन्हा दाखल करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.