वस्तुसंग्रहालयाच्या ऑनलाइन भेटीतून सकारात्मक ऊर्जा

मुंबई : रुग्णालयांच्या फे ऱ्या, औषधांचे सेवन, एकलकोंडेपणा इत्यादी कारणांमुळे वृद्ध, अपंग, आजारी व्यक्ती आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा तणावाखाली असतात. त्यांचा तणाव दूर करून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’ने ‘माझे काळजीवाहू आणि मी’ हा उपक्रम सुरू केला आहे. जूनमध्ये दर रविवारी गरजू व्यक्ती आणि त्यांच्या काळजीवाहूंना मार्गदर्शन केले जाणार आहे.

करोनाच्या साथीमुळे वृद्ध, आजारी व्यक्ती आणि त्यांचे काळजीवाहू यांच्यावरील मानसिक ताण वाढला आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना संग्रहालयातील मौल्यवान वस्तू ऑनलाइन माध्यमातून दाखवल्या जाणार आहेत; जेणेकरून घरात चर्चा करण्यासाठी एखादा सकारात्मक विषय मिळेल. ६, १३, २० आणि २७ जून रोजी सकाळी ११ ते १२ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ५ या वेळेत संग्रहालयाचे मार्गदर्शक गरजू आणि त्यांच्या काळजीवाहूंशी वैयक्तिक संवाद साधतील. या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास events@csmvs.in ईमेल आयडीवर गरजू व्यक्ती आणि काळजीवाहूचे नाव आणि वय, गरजू व्यक्तीची समस्या, मराठी-हिंदी-इंग्रजी यांपैकी आवश्यक भाषा अशी माहिती पाठवावी.