अकरावी प्रवेशासाठीची चुरस वाढणार

मुंबई : अकरावीला प्रवेश घेणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या (एसएससी) विद्यार्थ्यांना यंदा इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या कडव्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) आयसीएसई, आयजीसीएसई या शिक्षण मंडळांच्या दहावी निकालात ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्याच ७८ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी ‘कट ऑफ’ (किमान गुणमर्यादा) वाढण्याची शक्यता आहे.

सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई या मंडळांच्या निकालाच्या टक्केवारीत खूप फरक पडला नसला तरी अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सीबीएसईच्या निकालानुसार दहावीला ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास ५७ हजारांपर्यंत गेली आहे. आयसीएसईच्या परीक्षेत साधारण २१ हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांची संख्या मुंबईत अधिक आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेनंतर राज्यमंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्पर्धेत हे विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांची अधिक पसंती असलेल्या आघाडीच्या महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी यंदा या विद्यार्थ्यांची स्पर्धा अधिक वाढणार आहे. गेल्यावर्षी पहिल्या प्रवेश फेरीत अनेक महाविद्यालयांचे खुल्या गटातील प्रवेशाचे कट ऑफ गुण हे ९२ टक्क्यांपेक्षाही अधिक होते. यंदा त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अल्पसंख्याक महाविद्यालयांत कमी जागा

गेल्यावर्षी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार अल्पसंख्याक महाविद्यालयांना तीन प्रवेश फेऱ्यांनंतर त्यांच्याकडील ५० टक्के राखीव जागांपैकी रिक्त राहिलेल्या जागा समर्पित करता येणार आहेत. त्यामुळे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी या महाविद्यालयांच्या जागा कमी प्रमाणात उपलब्ध असतील. मुंबई आणि परिसरात सध्या ३०६ अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालये आहेत. सेंट झेविअर्स, मिठीबाई, जयहिंद यांसारख्या महाविद्यालयांचे कट आफ गुण वाढू शकतील.

प्रवेश क्षमतेत मात्र वाढ

अकरावीच्या प्रवेश क्षमतेतही यंदा साधारण साडेपाच हजार जागांची भर पडणार आहे. यंदा नव्याने ३५ महाविद्यालये सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे विज्ञान शाखेच्या २७, वाणिज्य शाखेच्या २५ आणि कला शाखेच्या १३ महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमता वाढणार आहे. त्यामुळे यंदा मुंबई  परिसरात अकरावीसाठी ३ लाख सात हजार जागा उपलब्ध असतील.

खुल्या जागांमध्ये घट

यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १६ टक्के आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या गटासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांमध्ये घट होणार आहे.

संस्थांतर्गत कोटाही घटला

मराठा आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या आरक्षणामुळे अकरावीला १०३ टक्क्यांपर्यंत आरक्षण होत होते. हे गणित जमवून आणण्यासाठी संस्थेला त्यांच्याकडील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी राखीव ठेवण्यात येणारा कोटा यंदा कमी करण्यात आला आहे. ज्या संस्थांचे त्यांच्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय असते अशा संस्थेतील विद्यार्थी त्याच संस्थेत प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य देतात. साधारण ६० ते ८० टक्क्यांमधील विद्यार्थी हे संस्थेतील हक्काच्या राखीव जागांवर प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांसाठी यंदा २० टक्क्यांऐवजी १० टक्के जागा राखीव असणार आहेत.