काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी देशात नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत असताना मुंबईच्या विमानतळावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास सोने तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती काळ्या पैशाच्या माध्यमातून सोने खरेदी करुन परदेशी निघाला असल्याच्या संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने या व्यक्तीवर अटकेची कारवाई केली. प्रणव शशिकांत चौहान नावाची भारतीय पासपोर्ट असणारी व्यक्ती सोने घेऊन कॅनडाला निघाली होती. मुंबईतील विमानतळावर त्यांना पकडण्यात आले. प्रवाशी विमानातून ही व्यक्ती २.५ किलो सोने घेऊन कॅनडाला जाण्याच्या तयारीत होती. या सोन्याचे अंदाजे बाजारमूल्य ६५.७६ लाख असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारताबाहेर सोन्याची तस्करी करण्यासाठी प्रणव चौहानने गुजरातमधील सूरतमधून सोने खरेदी केले होते. काळ्या पैशाचे रुपांतर पाढऱ्या पैशात रुपांतर करण्यासाठी दुबई किंवा कॅनडातील टोरंटोमध्ये सोने विकण्यासाठी जात असावी, असा अंदाज कस्टम अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. अवैध पैसा पुन्हा चलनात आणण्यासाठी परदेशामध्ये सोने विकून विदेशी चलनाच्या माध्यमातून पुन्हा मूल्यवान करण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. सीमा शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक बाहेर जाणाऱ्या प्रवाशावर हवाई गुप्तचर यंत्रणाचे अधिकारी नजर ठेऊन आहेत.

देशातील नोटबंदीनंतर सोने तस्करी बाजारात सोन्याचा भाव चांगलाच वधारला असून, प्रत्येक १० ग्रँममागे ६० हजार म्हणजे दुप्पट किंमत मोजून सोने खरेदी करण्यात येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून हद्दपार केल्या होत्या. या निर्णयानंतर काळ्या पैसा वैध करुन पुन्हा वापरात आणण्यासाठी वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. मुंबईच्या विमानतळावरुन प्रणव चव्हाण याला अटक करण्यात आली असून, सोने तस्करीच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.