शैलजा तिवले

२२७ जागा भरणार; तज्ज्ञ डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध होणार

डोळ्यांचे विकार, त्वचारोग, छोटय़ा शस्त्रक्रिया यासाठी आता रुग्णांना पालिकेच्या केईएम, नायर, शीव या प्रमुख रुग्णालयांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध व्हावेत, यासाठी मुंबईतील १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत २२७ जागा भरल्या जाणार आहेत.

शहरातील केईएम, शीव आणि नायर ही तीन प्रमुख रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असल्याने येथे तज्ज्ञ डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध असतात. त्यामुळे अगदी बोरिवली, वाशी, ठाणे इत्यादी दूरवरच्या ठिकाणांहून रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयांत येतात. या रुग्णालयांवरील वाढता कामाचा ताण कमी करण्यासाठी उपनगरीय रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर पालिका भर देत आहे. शहरात १६ उपनगरीय रुग्णालये उपलब्ध आहेत. यातील काही मोजकी रुग्णालये वगळता अन्य रुग्णालयांमध्ये विविध आजारांमधील तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांनी यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे उपनगरीय रुग्णालये उपलब्ध असूनही प्रमुख रुग्णालयांमधील गर्दी मात्र कमी होत नाही. यावर तोडगा काढत आता पालिकेने उपनगरीय रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

परळच्या कॉलेज ऑफ फिजिशियन अ‍ॅण्ड सर्जन (सीपीएस) संस्थेशी यासंबंधी पालिकेने करार केला आहे. बालरोग, अस्थिभंग, त्वचारोग, सर्जरी, डोळ्यांचे विकार, रेडिओलॉजी अशा २२ विषयांसाठी २२७ जागा उपलब्ध केल्या जाणार आहेत. रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या प्राध्यापकांनुसार या विद्यार्थ्यांची त्या रुग्णालयांमध्ये नेमणूक केली जाईल. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तेथे काही प्राध्यापकांच्या जागादेखील भरण्यात येणार आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रम रुग्णालय आवारात घेतला जाईल. काही अभ्यासक्रम हा सीपीएसच्या केंद्रीय पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रित घेतला जाणार आहे. पालिकेने २२ विषयांसाठीचे सुमारे १३ लाख रुपये नोंदणी शुल्कही सीपीएस संस्थेकडे भरले आहे. लवकरच हा अभ्यासक्रम सुरू होणार असून २२७ पूर्णवेळ डॉक्टर उपनगरीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

सीपीएने पालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांचा पाहणीदेखील नुकतीच केली आहे. सीपीएसने सुचविलेले काही बदलही पालिका रुग्णालयांमध्ये करण्याचे काम सुरू आहे. पालिका रुग्णालयातील सोईसुविधांसह संसाधनांचा वापर या डॉक्टरांना करता येणार आहे. मात्र त्यांना सीपीएसच्या नियमावलीनुसार विद्यावेतन देण्यात येईल, असे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

दोन वर्षांचा अभ्यासक्रम

पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांची उणीव भरून काढण्यासाठी हा मार्ग अवलंबिलेला आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असल्याने पूर्णवेळ त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध असेल. या विद्यार्थ्यांनाही पालिकेच्या डॉक्टरांच्या हाताखाली शिकण्याची संधी यामुळे प्राप्त होईल. रुग्णालयांच्या आवश्यकतेनुसार या डॉक्टरांची बदली करण्याचे अधिकार पालिकेला असणार आहेत. त्यामुळे आता उपनगरीय रुग्णालयांमध्ये सर्व प्रमुख आजारांवरील सुविधा रुग्णांना मिळू शकणार आहेत, असे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

पालिकेने मागणी केल्याप्रमाणे तितक्या जागा देण्यासाठी नक्कीच संमती दिली जाणार आहे. सर्व तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत. सध्या प्रवेश प्रक्रियाच सुरू आहे. साधारणपणे १५ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध असतील.

– डॉ. गिरीश मैंदरकर, अध्यक्ष, ‘सीपीएस’