९० दिवस पूर्ण झाले नसतानाही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या नियोजनातील गोंधळानंतर आता पदव्युत्तर पदवी परीक्षांच्या नियोजनाचा गोंधळ सुरु झाला आहे. यंदा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यत सुरु असताना विद्यापीठाने डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात या अभ्यासक्रमाच्या परीक्षा असल्याचे जाहीर केले आहे. मागील सत्रामध्ये रखडलेल्या पदवी परीक्षांच्या निकालामुळे लांबलेली पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, उशीरा सुरु झालेले वर्ग आणि अपुरा राहिलेला अभ्यासक्रम यामुळे आता महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा नियोजनशून्यतेमुळे मात्र विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आह.े

विद्यापीठाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले असून बहुतांश परीक्षा या डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सुरु होणार आहेत. संगणकआधारित मूल्यांकन पद्धतीमुळे यावर्षी पदवी परीक्षांचे निकाल लांबले असल्याने पदव्युत्तर पदवी परीक्षांची प्रवेश प्रकिया अगदी नोव्हेंबरपर्यत सुरु होती. नियमानुसार अभ्यासक्रमाचे वर्ग किमान ९० दिवस भरल्यानंतर परीक्षा घेता येतात. विद्यापीठाने या नियमाचे उल्लंघन करीत वर्ग भरुन ५० दिवसही पूर्ण झाले नसताना परीक्षेचे वेळापत्रक जाहीरकेले आहे.

पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया यंदा बराच काळ सुरु असून नोव्हेंबरपर्यत विद्यार्थी प्रवेश घेत होते. त्यामुळे यावर्षी वर्गही उशीरा सुरु झालेले आहेत . जेमतेम अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला असताना विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता उर्वरित दिवसांमध्ये अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा असा गंभीर प्रश्न महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे, असे एका महाविद्यालयांच्या प्राचार्यानी व्यक्त  केले आहे.

आधीच रखडलेल्या निकालामुळे आम्ही वैतागलो आहोत. मागील महिनाभरापासून खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात झाली आहे. तोपर्यत विद्यापीठाने परीक्षा जाहीर केल्या आहेत. आता महिन्याचाही अवधी हातामध्ये राहिलेला नाही. तेव्हा अभ्यास कसा करायचा हेच सुचत नाही, असे विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या एका विद्यार्थ्यांने सांगितले आहे.

दरम्यान बोर्डी येथील एन.बी.मेहता महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे निवेदन विद्यापीठाकडे दिले आहे. या संदर्भात मात्र परीक्षा भवनाच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे मनविसेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले आहे.