शिवसेना नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांच्यावर सध्या नेटकरी चांगलेच संतापले आहेत. यामागील कारण आहे त्यांनी ट्विट केलेला एक फोटो.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने अलिबागमधील मांडवा ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडीयादरम्यान बोट रुग्णवाहिका सुरु करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर अमेय घोले यांनी यासंदर्भात एक फोटो ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले होते. मात्र त्यांनी शेअर केलेला बोट रुग्णवाहिकेचा फोटो हा फ्रेंच बोटीचा असल्याचे समोर आलं आहे. घोले यांनी ट्विट केलेला फोटो फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्याजवळील ग्वेर्नसे येथील फ्लाइंग क्रिस्टीन ३ या रुग्णवाहिकेचा आहे. त्यामुळे घोले यांनी पोस्ट केलेल्या फोटोवरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

घोले यांनी “महाराष्ट्र सरकार अतिशय अनोखा आणि छान असा मांडवा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया बोट रुग्णवाहिकेचे लोकार्पण करीत आहेत,” अशा आशयाचे ट्विट करत मुख्यमंत्र्याचे आभार मानले होते. त्यानंतर शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील हे ट्विट शेअर केलं होतं.

 

घोले यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विट केलेला फोटो हा प्रातिनिधीक स्वरूपाचा होता असं घोले म्हणाले आहेत. मात्र ट्विटमध्ये हा प्रातिनिधिक फोटो असल्याचे नमूद करायला हवे होते असं सांगत त्यांनी आपली चूकही कबूल केली आहे. या प्रकरणामधून आपण धडा घेतला असून यापुढे अधिक काळजी घेऊन सोशल मिडियावर फोटो पोस्ट करणार असल्याचे घोले यांनी सांगितलं.

राफेल विमानांचे भारतात आगमन होण्यापूर्वी लोकांनीही सोशल मिडीयावर त्याचे फोटो वापरण्यात आले होते असं सांगत घोले यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “मी माझ्या ट्विटमध्ये असेही म्हटले नाही, की फोटोत दाखवलेलीच रुग्णवाहिका आपल्याकडे सुरू करण्यात आली आहे. चांगला उपक्रम सुरू केला जात आहे हे विरोधी पक्षातील सदस्यांना पचविणे शक्य नाही. ते सोशल मीडियावर फक्त त्याला विरोध करत आहेत,” अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांवर टीका केली. घोले यांना करोनाची लागण झाल्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बोटीच्या फोटोवर वाद निर्माण झाला असला तरी या बोटीमुळे रायगडकरांचे स्पीड बोट रुग्णवाहिकेच स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे.