मुख्यमंत्र्यांचे राजकीय पक्ष, संघटनांना आवाहन

मुंबई:  करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम त्वरित स्थगित करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राजकीय पक्ष आणि संघटनांना के ले आहे. राज्यातील करोनाचा वाढता संसर्ग हा धोक्याचा इशारा आहे. तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी राजकारण्यांना दिला.

राज्यात  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत असून गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन ठाकरे यांनी परत एकदा केले आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांनी  आता अधिक काळजी घ्यावी, गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू, अशी विनंती त्यांनी के ली आहे.