पावसाळ्यात जर्जर झालेले अनेक ठिकाणचे रस्ते आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामे पालिकेने एकाच वेळी सुरू केल्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच आता जल विभागानेही गंजलेल्या जलवाहिन्या बदलण्यास, तर सेवा उपयोगिता कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी चर खणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी मुंबईतील रस्त्यांचा पुरता बोजवारा उडला असून ‘खड्डेच खड्डे चोहीकडे’ अशी मुंबईची अवस्था झाली आहे.
पावसाळा ओसरल्यानंतर पालिकेने मुंबईत मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. अनेक ठिकाणचे लहान-मोठे रस्ते खड्डे खणून ठेवल्यामुळे वाहतुकीचे मार्ग वळवावे लागले आहेत. तर काही ठिकाणी निम्मा रस्ता खोदून, निम्मा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या निम्म्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. त्याचा फटका पादचाऱ्यांनाही बसू लागला आहे. मुंबईतील पदपथांवरील पेवर ब्लॉक बदलण्याचे कामही मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. काही पदपथांवरील पेवर ब्लॉक बदलून आठ महिनेही लोटलेले नसताना ते उखडून नवे पेवर ब्लॉक बसविण्याची कामे सुरू आहेत. पदपथ खोदल्याने पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालावे लागत आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून छोटय़ा-मोठय़ा अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
रस्ते आणि पदपथांच्या कामांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना आता जलविभाग आणि सेवा उपयोगिता कंपन्यांच्या कामांमुळेही फटका बसू लागला आहे. अनेक भागातील जुन्या गंजलेल्या छोटय़ा-छोटय़ा जलवाहिन्या बदलण्याचे काम जल विभागाने मोठय़ा प्रमाणावर हाती घेतले आहे. त्यामुळे अनेक भागात खोदकाम करून जलवाहिन्या बदलण्यास सुरुवात झाली आहे. गळती आणि दूषित पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने जल विभागाने ही कामे हाती घेतली आहेत. परंतु रस्त्यांची कामे सुरू असतानाच वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यांवरील जलवाहिन्या बदलण्याची कामे हाती घेतल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सेवा उपयोगिता कंपन्यांनी केबलच्या कामांसाठी रस्ते खोदाई सुरू केली आहे. पदपथ अथवा त्यालगतच्या भागात खोदकाम करून केबल टाकण्यात येत आहेत. केबल टाकून झाल्यावर खड्डय़ात निम्मी माती ढकलून कामगार कामे उरकत आहेत. उरलेल्या मातीचे ढीग अनेक ठिकाणी रस्त्यावरच पडलेले आहेत. त्यातच फेरीवाल्यांचा अडथळाही कायम आहे.