अनेक रस्ते तयार झाले, अनेक नव्याने होत आहेत. काहींची रुंदी वाढवली जात आहे, तर काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठीही खल चालू आहे; पण तरीही मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. याला कारण आहे मुंबईकरांची श्वासकोंडी करणारी काही ठिकाणे..

देशाची आíथक राजधानी, राज्याची राजधानी आणि एक जागतिक शहर अशी ओळख सांगणाऱ्या मुंबईला जगातल्या अनेक शहरांप्रमाणेच जागेच्या कमतरतेला तोंड द्यावे लागते. शहरातील जागेचा अभाव आणि प्रचंड लोकवस्ती यामुळे विकासाची अनेक कामे रखडल्याची किंवा पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे वा सुधार करणे शक्य नसल्याची काही उदाहरणे भारतातच नाही, तर परदेशातही पाहायला मिळतात. त्यामुळेच मग उपनगर नावाची संकल्पनाही तयार होते; पण उपनगरांमुळे मूळ शहराचे प्रश्न न सुटता त्यात भर पडते. उपनगरांमध्ये राहणारे लोक कामासाठी किंवा रोजगारासाठी पुन्हा शहराकडेच दर दिवशी धावतात, हे सत्य जगभरातल्या कोणत्याही मोठय़ा शहरात सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या गर्दीवरून सहज लक्षात यावे.

मुंबईदेखील याला अपवाद नाही. सात बेटांच्या जोडणीतून तयार झालेल्या या शहराला प्रचंड भौगोलिक मर्यादा आहेत. त्यामुळे मुंबई शहर म्हणून नावारूपाला यायला लागल्यापासूनच या शहराबाजूची उपनगरेही तेवढय़ाच झपाटय़ाने विकसित झाली. आता तर कालानुरूप त्यात भर पडत आहे. कोणत्याही शहराला उत्तम शहर म्हणवून घ्यायचे असेल, तर तेथे काही पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असणे क्रमप्राप्त आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरातील रस्ते आणि रस्त्यांची जोडणी! मुंबई शहर नेमक्या याच बाबतीत इतर शहरांच्या तुलनेत पिछाडीवर आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील रस्ते विकासाचा वेग नक्कीच चांगला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएच्या निर्मितीनंतर तर मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांनी कात टाकायला सुरुवात केली. पश्चिम तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर उड्डाणपुलांचे जाळे, या दोन्ही महामार्गाची रुंदी वाढवणे, पूर्व मुक्तमार्ग, शीव-पनवेल महामार्ग, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता, जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता, घाटकोपर-मानखुर्द रस्ता, सहार उन्नत मार्ग, वांद्रे-वरळी सागरी सेतू आदी विविध प्रकल्पांमुळे मुंबईतील रस्ते वाहतूक पूर्वीच्या तुलनेत खूपच सोयीची झाली. असे असले, तरी या मोठय़ा प्रकल्पांच्या पूर्ततेनंतरही मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या कमी झालेली नाही. यासाठी दरवर्षी वाढणारी वाहनांची संख्या हेच एकमेव कारण नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

मोठमोठे रस्ते किंवा प्रकल्प होऊनही ही वाहतूक कोंडी न सुटण्यामागे या प्रकल्पांचे काहीसे चुकलेले नियोजन, हादेखील मोठा भाग आहे. कोणताही रस्ता बांधताना किंवा रुंद करताना तो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सारख्याच रुंदीचा असेल, हे मुंबईसारख्या शहरांमध्ये शक्य नसते; पण त्याच्या रुंदीमध्ये प्रचंड तफावत आढळल्यास कमी रुंदीच्या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होणार, हे ठरलेले आहे. मुंबईतही सध्या नेमके तेच पाहायला मिळत आहे. दरवर्षी हजारोंनी वाढणारी वाहनांची संख्या आणि अचानक काही ठिकाणी रुंदी कमी होणारे हे रस्ते, या कात्रीत मुंबईच्या वाहतूक कोंडीचे बरेचसे सार सामावलेले आहे.

अगदी नव्याने तयार झालेला पूर्व मुक्तमार्ग असो किंवा सहार उन्नत मार्ग असो, वाहने या मार्गावर असेपर्यंत काहीच समस्या नसते. समस्या उद्भवते ती हे मार्ग संपल्यानंतर दोन्ही टोकांना! पूर्व मुक्तमार्गाचेच उदाहरण द्यायचे, तर सकाळच्या वेळी घाटकोपरवरून या मुक्तमार्गावर येणाऱ्या गाडय़ा वाडीबंदपर्यंत अक्षरश: १५ मिनिटांमध्ये पोहोचतात. त्यापुढे कारनॅक पुलापर्यंत येण्यासाठी गाडय़ांना अर्धा तास लागतो आणि रिगल सिनेमापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तासभरही लागतो. संध्याकाळी फोर्ट परिसरातून पूर्व मुक्तमार्गापर्यंत पोहोचण्यासाठीच एक किंवा दीड तासाचा कालावधी लागतो.

तीच गोष्ट वरळीच्या अटारिया मॉलच्या बाजूने संध्याकाळच्या वेळी वांद्रे-वरळी सागरी सेतूने घरी परतणाऱ्या लोकांची! संध्याकाळी सागरी सेतूने वरळी ते वांद्रे हे अंतर पाच ते सात मिनिटांमध्ये कापणारी वाहने पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागली की, ती कलानगर उड्डाणपुलाजवळ येऊन अडकलीच पाहिजेत. सहार उन्नत मार्गावरील वाहने आंततराष्ट्रीय विमानतळ ते पश्चिम द्रुतगती महामार्ग हे अंतर पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळात पूर्ण करतात; पण त्यापुढे महामार्गावरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर इंच इंच पुढे सरकण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावर कुल्र्याजवळ बांधलेल्या दुमजली उड्डाणपुलाचीही हीच कथा आहे. हा उड्डाणपूल घाटकोपरजवळ छेडा नगरच्या येथे उतरतो, त्या ठिकाणी चेंबूरहून आलेली वाहने, मुंबईकडून येणारी वाहने यांच्या कोंडीत जोडरस्त्याने आलेली वाहनेही फसतात, तर सांताक्रुझकडे जाताना कुल्र्याजवळ हा उड्डाणपूल उतरल्यानंतर या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

पूर्व द्रुतगती महामार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता अशा सगळ्याच ठिकाणी अशी वाहतूक कोंडीची अनेक ठिकाणे आहेत. पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर तर अनेक उड्डाणपुलांवरून खाली उतरल्यानंतर लगेचच वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भायखळा स्थानकाजवळ उतरणारा लालबागचा उड्डाणपूल! हा उड्डाणपूल जेथे उतरतो तेथे रस्ता प्रचंड चिंचोळा आहे. त्या चिंचोळ्या रस्त्यावरून उड्डाणपुलाखालून येणारी वाहने आणि वरून येणारी वाहने एकत्र येतात आणि वाहतूक कोंडी होते.

ही सर्व ठिकाणे नियोजन करणाऱ्या संस्थांची नियोजनशून्यता दाखवतात. रस्तेबांधणीचा कोणताही प्रकल्प उभारताना बॉटलनेक्स किंवा अरुंद होणाऱ्या रस्त्याबाबत आधीच विचार करणे आवश्यक असते. अशा ठिकाणी वाहतूक कोंडी होणार, यात काहीच शंका नसते; पण ती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास प्रकल्प सुरू होण्याआधीच होणे आवश्यक आहे. या उपाययोजना प्रत्यक्ष प्रकल्प उभारताना अमलातही आणल्या गेल्या पाहिजेत.

या अशा कोंडी होणाऱ्या ठिकाणांमुळे फक्त वाहतूक कोंडी हीच एकमेव समस्या नाही. वाहतूक कोंडीबरोबरच, किंबहुना कोंडीमुळेच या ठिकाणी प्रदूषणही होते. अंधेरी-घाटकोपर रस्त्यासारख्या निवासी इमारती असलेल्या रस्त्यांवर झालेल्या वाहतूक कोंडीचा थेट परिणाम तेथील रहिवाशांच्या आरोग्यावरही होत असतो. त्याशिवाय इंधनाची नासाडी होण्याचे प्रकारही याच कोंडीच्या ठिकाणांमुळे घडतात. नियोजनशून्यतेच्या अभावामुळे झालेली ही वाहतूक कोंडी भविष्यात होऊ नये यासाठी ही खबरदारी नियोजन करणाऱ्या संबंधित संस्थांना नक्कीच घेता येईल; पण सध्या तयार झालेल्या या प्रकल्पांवरील ही श्वासकोंडी सोडवण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी काही प्रस्थापित बांधकामे हलवण्याची गरज पडणार आहे, तर काही ठिकाणी मोकळ्या जागेवर रस्ता बांधून तो रुंद करण्याची गरज आहे. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील आयआयटी पवईसारख्या काही ठिकाणी रस्त्यात मंदिरेही आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. अशा वेळी संबंधित परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित मंदिराचे विश्वस्त आदींशी बोलून ही स्थळे रस्त्यावरून हटवणेही गरजेचे आहे.

ता.क. – या बॉटलनेक किंवा कोंडी होण्याच्या हमखास ठिकाणांव्यतिरिक्त आणखी एका ठिकाणी नेहमीच वाहनांची कोंडी होताना दिसते. ती फोडण्यासाठी मात्र सरकारी यंत्रणांना नियोजनाबरोबरच काही खमके निर्णय घेण्याचीही आवश्यकता आहे. ही ठिकाणे म्हणजे रस्तोरस्ती उभारलेले पथकर नाके!