गेल्या पाच वर्षांमध्ये पालिकेने कंत्राटदारांमार्फत मुंबईमधील सिमेंट काँक्रिट आणि डांबरी अशा एकूण तब्बल १,८३३ रस्त्यांची दुरुस्ती करून घेतली. मात्र यापैकी बहुसंख्य रस्ते अल्पावधीतच खड्डय़ांमध्ये गेल्यामुळे कंत्राटदारांनी केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिकेचे कोटय़वधी रुपये पाण्यात गेले आहेत. मात्र, महापौरांनी पाठविलेल्या गोपनीय पत्राची दखल घेत पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात ३४, तर दुसऱ्या टप्प्यात २०० रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र उर्वरित १,५९९ रस्ते चौकशीच्या फेऱ्याबाहेर असून याही रस्त्यांची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

निविदांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या अटीनुसार दुरुस्तीनंतर रस्त्यावर पडणारा खड्डा बुजविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. मात्र रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर अनेक वेळा कंत्राटदार त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. तसेच दुरुस्तीनंतर खराब होणारे हमी कालावधीतील रस्ते कंत्राटदाराकडून गुळगुळीत करून घेण्याकडे अधिकाऱ्यांचेही फारसे लक्ष नसते. त्यामुळे कंत्राटदाराचे फावते आणि त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो.

गेल्या पाच वर्षांमध्ये दुरुस्त करण्यात आलेले रस्ते आजही खड्डय़ात गेले असून त्यांची दुरुस्ती कंत्राटदारांनी करून देणे क्रमप्राप्त होते. मात्र २०१२-१३ मध्ये दुरुस्ती झालेल्या बहुतेक रस्त्यांचा हमी कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता खड्डे बुजवून हे रस्ते गुळगुळीत करण्यासाठी करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेले पैसे मोजावे लागणार आहेत. महापौर स्नेहल आंबेकर यांनी गोपनीय पत्र पाठवून रस्ते कामांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यांत २३ रस्त्यांची चौकशी करण्यात आली असून चार अभियंत्यांना अटक झाली आहे. तर सहा कंत्राटदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल १,८३३ रस्त्यांची दुरुस्ती झाल्यानंतर त्यावर पडलेल्या खड्डय़ांचा प्रश्न अनुत्तरित आहे. या रस्त्यांच्या कामाचा दर्जा योग्य नसल्यामुळे त्यांची दैना उडाली असून या रस्ते कामांचीही चौकशी करणार की नाही असा प्रश्न मुंबईकर विचारू लागले आहेत.

१,८३३ रस्त्यांच्या दुरुस्तीवर ११,०८९.६६ कोटी खर्च

पालिकेच्या मागील निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारी २०१२ पासून आजतागायत पालिकेने लहान-मोठय़ा अशा तब्बल १,८३३ सिमेंट काँक्रिट आणि डांबरी रस्त्यांची दुरुस्ती केली. त्यावर तब्बल ११,०८९.६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये खड्डय़ांमुळे ओबडधोबड झालेल्या शहर भागातील सिमेंट काँक्रिटचे ७०, पश्चिम उपनगरांतील १६६, तर पूर्व उपनगरांमधील ८० अशा एकूण ३१६ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी पालिकेने तब्बल ४,३५५,७१ कोटी रुपये खर्च केले. पावसाच्या तडाख्यात जागोजागी खड्डे पडल्यामुळे, तसेच गेली अनेक वर्षे दुरुस्ती न झाल्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने १,५१७ डांबरी रस्त्यांची दुरुस्ती केली. त्यात शहरातील ४१२, पश्चिम उपनगरांमधील ५७६, तर पूर्व उपनगरांमधील ५२९ लहान-मोठय़ा रस्त्यांचा समावेश होता. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला ६,७३३,९५ कोटी रुपये मोजावे लागले. पालिकेने ही सर्व कामे कंत्राटदारांच्या माध्यमातून करून घेतली. त्याचबरोबर रस्ते दुरुस्तीमध्ये घोटाळा होऊ नये म्हणून कामावर देखरेख करण्यासाठी २०१३ पासून त्रयस्थ तज्ज्ञ कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल ११,०८९.६६ कोटी रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आलेल्या १,८३३ सिमेंट काँक्रिट आणि डांबरी रस्त्यांपैकी बहुसंख्य रस्ते खड्डय़ात गेले आहेत.