मुख्यालय परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांची चाळण

पावसाच्या माऱ्यामुळे रस्त्यावर पडणारे खड्डे नागरिकांच्या तक्रारीनंतर तातडीने बुजवण्यात येतात, असा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या दारातच भलेमोठे खड्डे पडल्याचे चित्र प्रशासकीय दाव्यांचा विरोधाभास दर्शवत आहे. कुलाब्यापासून दहिसर-मुलुंडपर्यंतच्या रस्त्यांवरील हजारो खड्डे भरल्याचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरील दादाभाई नौरोजी मार्ग, सोमाणी मार्ग आणि सीएसटी स्थानकाकडे जाणारा वालचंद हिराचंद मार्ग या तिन्ही मुख्य रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसत आहे. या रस्त्यांवरून दररोज ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांना तसेच वाहनांना या खड्डय़ांचे अडथळे पार करावे लागत आहेत. त्यामुळे आता आपल्या दारातील खड्डे बुजवण्यासाठीही पालिका नागरिकांच्या तक्रारी येण्याची वाट पाहणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण होऊ लागली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शिवाय पाणी साचल्याने खड्डय़ांचा अंदाज येत नाही व अपघात घडतात. असे असले तरी पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईतील खड्डय़ांची संख्या फारच कमी आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी मिळताच खड्डे बुजवण्यात येत असल्याचा दावाही प्रशासनाकडून केला जात आहे.

एकीकडे पालिका असे दावे करत असली तरी प्रत्यक्षात पालिका मुख्यालय असलेल्या सीएसटी परिसरातच रस्त्यांवर सर्वत्र खड्डे दिसत आहेत. पालिका मुख्यालयाच्या समोरील दादाभाई नौरोजी मार्गावरील सिग्नलच्या जवळ मध्यभागीच एक मोठा खड्डा पडला आहे, बरोबर मध्यभागी असल्याने हा खड्डा वाहनचालकांना टाळताच येत नाही. तसेच चर्चगेटवरून सीएसटीकडे येणाऱ्या वालचंद हिराचंद मार्गावरदेखील मोठमोठाले खड्डे पडले आहेत.

या खड्डय़ांचा सामना करतच चालकांना येथून वाट काढावी लागते. तर सोमाणी मार्गावरील मुख्य सिग्नलजवळही खड्डय़ांचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते.

बसने प्रवास करताना खड्डय़ांमुळे खूप गचके बसतात. त्यामुळे कंबरेलाही त्रास होतो. आम्हाला आता या बस प्रवासाची सवय झाली आहे. मात्र मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे, लहान मुलांना घेऊन येणाऱ्या महिलांचे आणि वृद्धांचे यात नक्कीच हाल होत असतील.

– गजानन महाले, बेस्ट प्रवासी

बस चालवताना अनेक खड्डय़ांना सामोरे जावे लागते. या खड्डय़ांमुळे बसचेदेखील नुकसान होत असते, शिवाय गचके बसल्याने प्रवाशांबरोबरच आम्हालाही त्रास होतो.

– बेस्ट बसवाहक

पालिकेसमोरील मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र पाऊस सतत पडत असल्याने या कामात अडथळा येत आहे. येत्या दोन दिवसांत हे खड्डे बुजविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

– किरण दिघावकर, सहायक आयुक्त, ए विभाग