मंडप उभारण्यासाठी भर रस्त्यांत खड्डे

एकीकडे पावसामुळे पडलेल्या खड्डय़ांनी मुंबईतील रस्त्यांची चाळण केली असताना, यामध्ये आता गणेशोत्सवासाठी खोदण्यात येणाऱ्या खड्डय़ांची भर पडली आहे. गणेशोत्सवापूर्वी महापालिकेकडे खड्डेमुक्त रस्त्यांचा आग्रह धरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच मुंबईत ठिकठिकाणी मंडप उभारण्याकरिता पदपथाबरोबरच थेट रस्त्यांवर खड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कधी खड्डेरूपी राक्षस रंगवून तर कधी खड्डय़ांमध्ये नोटा भरून पालिकेला धारेवर धरू पाहणारे सर्वपक्षीय नगरसेवकही मात्र या खोदकामाबाबत सोयीस्कर मौन बाळगून आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षीचे खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना दंडाच्या रकमेतून सवलत देण्याचे आश्वासन दिल्याने मंडळांना मोकळे रानच मिळाले आहे.

सालाबादप्रमाणे याही वर्षी रस्त्यांवरील खड्डय़ांवरून महाभारत रंगले. यात पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर जरा अधिकच आक्रमक होत मनसे, काँग्रेस यांनी आपापल्या परीने आंदोलनाचे रंग भरले. आता गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही पालिकेला धारेवर धरीत आहेत. मंडळांनी पालिकेला २१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याची मुदत दिली आहे. परंतु, रस्त्यांची खड्डय़ांनी चाळणी करण्याला ही मंडळेही जबाबदार आहेत.  बोरिवलीत शिंपोली येथील कस्तुरपार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रस्त्यातच मंडपासाठी रस्ते खणले आहेत.

येथील रस्त्यांवर आधीच खड्डय़ांचे साम्राज्य आहे. त्यात गणेशोत्सवानंतर भर पडणार आहे. पवईच्या चैतन्य नगर येथील सार्वजनिक गणेश मंडळाने तर संपूर्ण रस्ताच मंडपाकरिता अडविला आहे. रस्ता अडविण्याबरोबरच रस्तेही खणून ठेवल्याने या रस्त्याचीही चाळणी झालेली गणेशोत्सवानंतर रहिवाशांना अनुभवायला मिळेल. इथेच आयआयटीच्या समोरील रस्त्यावरही पदपथ आणि रस्त्यावरही खड्डे खणून मंडप उभारलेला दिसून येतो.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

रस्ते न खणताही मंडप बांधता येतात. जाड बांबू बांधून किंवा वाळूच्या मोठय़ा पिंपात बांबू रोवून मंडप उभारता येतात. मात्र गणेश मंडळांना भव्य देखावा उभारायचा असेल तर त्या करिता रस्ते खणून वासे उभारावे लागतात.

त्यांना पुन्हा बांबूचा आधार द्यावा लागतो. यात रस्त्यांची मात्र चांगलीच चाळण होते.

सामान्य नागरिकांना व वाहतुकीला अडसर न बनता मंडप उभारण्याबाबत न्यायालयाने वारंवार बजावूनही या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असताना दिसते आहे.

दंडातून सवलत मिळाल्याने मुजोरी

  • मंडपांकरिता खड्डे खणल्याबद्दल सुमारे ७० गणेशोत्सव मंडळांना गेल्या वर्षी दंड आकारण्यात आला होता. तसेच त्यांना यंदा परवानगी न देण्याचे पालिकेने ठरवले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंडळांना दंडाच्या रकमेतून सवलत देण्याचे आश्वासन दिले.
  • गेल्या वर्षी १३ मार्च २०१५ला उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार  खड्डे खणणाऱ्या मंडळांना प्रत्येक खड्डय़ाकरिता दोन हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. परंतु अनेक मंडळांनी दंड भरलेला नाही.
  • विविध कारणांकरिता पालिका, पोलीस अशा संबंधित यंत्रणांकडून परवानगी घ्यावी लागते. मुंबईत ११,७५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, परंतु त्यापैकी अवघी तीन हजार मंडळेच या परवानग्या घेतात.

मुंबईत १०० पैकी ४० टक्के मंडळेच केवळ रस्त्यांवर मंडप उभारतात. उर्वरित मैदाने किंवा सोसायटय़ांच्या आवारात उत्सव साजरा करतात. रस्ते न खणता, वाहतूक वा रहदारीत अडसर न बनता मंडप उभारले जावे, असे आवाहन आम्ही मंडळांना केले आहे. अनेकांनी या दृष्टीने बदलही केले आहेत. काहींनी मंडपाचा आकारही कमी केला आहे. तरीही मंडळे रस्ते खणत आहेत, हे खरे आहे. अर्थात ही मानसिकता हळूहळू बदलेल.

– नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती