News Flash

खाऊखुशाल : पोटासोबत मनाची तृप्ती

‘पोटोबा’च्या मेन्यूमध्ये ‘घरची आठवण’ असा विशेष रकाना आहे आणि हेच ‘पोटोबा’चं वैशिष्टय़ आहे.

काहीतरी नवीन पदार्थ चाखायला मिळतील किंवा कधीतरी जेवण बनवण्याचाच कंटाळा आला म्हणून पूर्वी हॉटेलची पायरी चढली जायची. पण हल्ली हॉटेलला जाऊन खाणं किंवा पार्सल मागवणं हे नित्याचंच झालंय. बदललेली जीवनशैली हे त्याचं कारण. त्यामुळे आता खरंतर हॉटेलमध्ये जाऊन वेगळं काहीतरी खाण्यापेक्षा साधे आणि नेहमीचे पदार्थ खाण्याकडेही अनेकांचा ओढा असतो. विशेषत: मराठी कुटुंबातील प्रौढांना हॉटेलमध्ये गेल्यावरही घरचेच पदार्थ खायचे असतात, कारण ते मन आणि पोट दोन्ही भरतात. तर तरुणांना ते चाखायचे असतात कारण ते पदार्थ बनवण्याची पारंपरिक पद्धत आणि खरी चव त्यांना चाखायची असते. अशा वेळी हे पदार्थ नेमके मिळतात कुठे हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला माहीमच्या ‘पोटोबा’मध्ये सापडू शकेल.

‘पोटोबा’च्या मेन्यूमध्ये ‘घरची आठवण’ असा विशेष रकाना आहे आणि हेच ‘पोटोबा’चं वैशिष्टय़ आहे. वरणफळ, फोडणीची पोळी, थालीपीठ लोणी, फोडणीचा भात-दही, तिखट-मीठ पुरी लोणचे, मेतकूट तूप भात, मसाले भात, वरण तूप भात, भाकरी आणि वांग्याची भाजी, भाकरी आणि मटकी उसळ, तांदळाची भाकरी आणि पालेभाजी, पिठलं भाकरी हे आपल्याला माहीत असलेले पदार्थ. घरी खातो तेच पदार्थ हॉटेलमध्ये जाऊन खाण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न पडू शकतो. पण वर नमूद केलेले पदार्थ नेहमीचेच किंवा सर्वाच्या स्वयंपाकघरात शिजत असले तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरच्या स्वयंपाकाची चव वेगळी असते. आपल्याला नेहमीच दुसऱ्याच्या डब्यातला स्वयंपाक आवडत असतो. हेच ‘पोटोबा’चं वेगळेपण आहे.

पदार्थ वाचायला नेहमीचेच वाटतात पण चवीला मात्र निराळे आहे. ‘वरणफळ’ हा पदार्थ हॉटेलच्या मेन्यूमध्ये सहसा दिसत नाही आणि अमराठी लोकांना तर वाचायलाही नवा वाटतो. देशावर ‘वरणफळ’ हे नाव प्रचलित असलं तरी त्याला काही ठिकाणी ‘चिखल्या’ या नावानेही ओळखलं जातं. गुजराती लोकांच्या डाळ-ढोकळीच्या जवळपास जाणारा हा पदार्थ. तसं पाहायला गेलं तर अनेक मराठी घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो तयार केला जातो. पण ‘पोटोबा’मध्ये मिळणारं वरणफळ अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं म्हणजे चवीला आंबट-गोड आहे. गूळ आणि चिंच घालूल तयार केलेल्या आमटीमध्ये शंकरपाळ्यांसारख्या कापलेल्या पोळीचे तुकडे घालून तयार केलेला हा पदार्थ सव्‍‌र्ह करताना त्यावर साजूक तूप घालून दिल्याने त्याची लज्जत आणखीन वाढते.

‘फोडणीची पोळी’ हा असाच आणखीन एक नेहमीच्या परिचयाचा पदार्थ. उरलेल्या चपात्यांपासून तयार केलेल्या या पदार्थाची प्रत्येकाच्या घरची चव वेगळी असते. घरात आपण शिल्लक राहिलेल्या चपात्या वापरत असलो तरी पोटोबामध्ये तो तयार करण्यासाठी ताज्या चपात्यांचा वापर केला जातो. मोहरीचा तडका देऊन जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, बारीक चिरलेला भरपूर कांदा, तळलेले शेंगदाणे, थोडा लिंबाचा रस, चिमूटभर साखर यांच्या मिश्रणातून तयार झालेली आणि वर कोथिंबीर घालून सजवलेली फोडणीची पोळी हॉटेलमधील इतर फास्टफूड पदार्थापेक्षा चवीला आणि आरोग्याला केव्हाही चांगली.

पिठलं भाकरी, कांदा, हिरव्या मिर्चीचा खरडा आणि लसणाची चटणी असा बेतही येथे आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आवडत्या तांदळाच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत वांग्याचं भरीत आणि दररोज वेगळी उसळही असते. घाटावरून कोकणात आलात तर काळा वाटाणा उसळ, मालवणी आमटी, काजू उसळ हे मालवणी स्पेशल पदार्थही मेन्यूमध्ये आहेतच.  थोडं जड आणि मसालेदार खायचं असेल तर हॉटेलमध्ये गेल्यावर अनेकांची पसंती पंजाबी पदार्थाना असते. एखादी मसालेदार भाजी आणि रोटी खाल्ली काम फत्ते. पोटोबामध्येही पंजाबी पदार्थ आहेत पण त्याला थोडी वेगळी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथला ‘पनीर बिरबली’ हा पदार्थ दिसायला आणि चवीलाही वेगळा आहे. पनीर लाटून घेऊन त्यामध्ये हिरव्या मसाल्याचं मिश्रण स्टफ केलं जातं आणि नंतर त्याचे काप केले जातात. हे काप लाल मसाल्याच्या ग्रेव्हीवर ठेवून त्याला काजू, किसलेलं पनीर, कोथिंबीर आणि बाजूने काकडी व टोमॅटोच्या कापांनी सजवलं जातं. ही बिरबली गरमागरम बटर रोटीसोबत चमचमीत लागते.

श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे शाकाहारी पदार्थाना अनेकांची पसंती असते. या काळात उपवासाच्या पदार्थाचीही पोटोबामध्ये रेलचेल आहे. साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, बटाटा चिप्स, राजगिऱ्याची पुरी आणि बटाटय़ाची पांढरी भाजी, राजगिऱ्याच्या पुरीसोबत आम्रखंड असाही पर्याय येथे आहे. रताळ्याचा हलवा, रताळ्याचा कीस आणि शेंगदाण्याची आमटी असा लांबलचक मेन्यू आहे. तसंच शिंगाडा, वरी तांदूळ, साबुदाणा आणि राजगिऱ्याच्या पीठापासून तयार केलेलं उपवासाचं थालीपाठ लोण्यासह सव्‍‌र्ह केलं जातं, ते मुद्दामहून खाण्यासारखं आहे. त्याशिवाय नेहमीचं भाजणीचं थालीपीठही आहेच.

भरपूर चीज, पनीर, हिरवी मिरची, कांदा, चवीला मीठ आणि कोथिंबीर यांचं स्टफिंग असलेला पनीर चीज समोसाही एकदा तरी चाखायला हवा. गोड पदार्थामध्ये उकडीचे मोदक, पुरणपोळी हे सर्वाच्याच आवडीचे पदार्थही मिळतात. त्याचसोबत सर्वाच्या परिचयाचा पण सहसा हॉटेलमध्ये न मिळणारा आणखीन एक पदार्थ येथे मिळतो, तो म्हणजे ‘केळीचे शिकरण आणि चपाती’. मलाईच्या दुधात काप करून किंवा कुस्करून (तुमच्या आवडीप्रमाणे) तयार केलेलं शिकरण आणि तूप लावलेल्या गरमागरम चपात्या कदाचित पहिल्यांदाच हॉटेलमध्ये बसून खाल, पण कधीतरी हासुद्धा अनुभव घ्यायला काय हरकत आहे.

‘पोटोबा’च्या मेन्यूमध्ये एकूण साडेतीनशे पदार्थ आहेत. नेहमीप्रमाणेच इतर ठिकाणी न मिळणाऱ्या पदार्थाची माहिती घेण्याचा हा प्रयत्न होता. बाकी पदार्थ तुमची आवड आणि सवडीनुसार तिथे जाऊन चाखू शकता. पोटोबाची माहीमशिवाय सांताक्रूझ आणि पुण्यातही शाखा आहे. त्यामुळे घरी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल आणि तरीसुद्धा घरचेच पदार्थ खायचे असतील तर ‘पोटोबा’ चांगला पर्याय ठरू शकतो.

पोटोबा – घरची आठवण

  • कुठे – १, डायमंड कोर्ट सोसायटी, ‘क्लाऊड ९ जिम’समोर, एल. जे. रोड, माहीम, मुंबई.
  • कधी – सोमवार ते रविवार सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 3:21 am

Web Title: potoba restaurant mahim maharashtrian food in potoba
Next Stories
1 बळीराजासाठी मदत केंद्राचा सिद्धिविनायक चरणी ‘श्रीगणेशा’
2 ‘झोपु’ प्राधिकरणात यापुढे अर्ज, प्रस्ताव सारेच ‘ऑनलाइन’!
3 प्रतीक ठाकरे आणि शुभम कथले ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
Just Now!
X