News Flash

मुंबईत मुसळधार; पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत मागील २४ तासांत २०० मिमी पावासाची नोंद

मुंबईत दोन दिवसात झालेल्या व सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. शिवाय, मुंबईत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे माणसांना पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी ते वापरले जाते. गेल्या तीन दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ चौरस किलोमीटर –
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. या तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही १९५ फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लिटर पाणी असते. (५,४५५ दशलक्ष लिटर) हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत मागील २४ तासांत २०० मिमी पावासाची नोंद झाली आहे. पुढील तीन तास मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते.

राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज –

दक्षिण गुजरात आणि लगतच्या प्रदेशात तयार झालेल्या चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) स्थितीमुळे दोन दिवस सलग पाऊस कोसळत आहे. चक्रवाती वर्तुळाकार स्थितीची तीव्रता रविवारी कमी होणार असली तरी राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि उर्वरीत मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडू शकतो.

मुसळधार आणि अतिवृष्टी म्हणजे किती पाऊस? –
Heavy Rainfall – मुसळधार – 65 ते 115 मिमी
Heavy to Very Heavy – मुसळधार ते अतिमुसळधार – 115 ते 200 मिमी
Extremely Heavy – अतितीव्र मुसळधार/अतिवृष्टी – 200 मिमी पेक्षा अधिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 2:19 pm

Web Title: powai lake in mumbai overflows due to incessant rainfall msr 87
टॅग : Heavy Rainfall,Monsoon
Next Stories
1 मुंबई हादरली! वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं बोलवून महिलेवर सामूहिक बलात्कार
2 पुढील तीन तास मुंबईत मुसळधार; हवामान खात्याचा इशारा
3 मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मागील २४ तासांत २०० मिमी पाऊस
Just Now!
X