मुंबईला बाहेरून वीज आणणारी पारेषण यंत्रणा कोलमडल्यानंतर मुंबईची विद्युत यंत्रणा वेगळी झाली (आयलंडिंग) खरी, पण टाटा पॉवरचे वीजसंच क्रमांक ५ आणि ७ असे ६८० मेगावॉटचे संच आयत्यावेळी बंद पडल्याने मुंबईतील वीजसंकटाची तीव्रता वाढल्याचा प्राथमिक अहवाल राज्य भार प्रेषण केंद्राने राज्य वीज नियामक आयोगाला दिला आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने १२ ऑक्टोबरला मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्य़ांत वीजपुरवठा खंडित झाल्याची दखल घेत याबाबतचा अहवाल मागवला होता. मुंबईसह राज्यातील वीज वहन यंत्रणेचे नियंत्रण करणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्राने तो अहवाल वीज नियामक आयोगाला सादर केला आहे.