राज्यात सर्वात कमी वीजहानी आणिवीजदेयकांची  १०० टक्के वसुली असलेल्या डोंबिवलीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला विजेच्या लपंडाव आता संपणार आहे. डोंबिवलीतील विद्युत यंत्रणा विस्ताराचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला असून त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे सुमारे साडेसात लाख लोकांची विजेच्या लपंडावापासून सुटका होणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून डोंबिवलीत सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. या ना त्या कारणाने रात्री-अपरात्री चार-सहा तास वीज जाण्याचे प्रकार अनेकदा घडले. दिवसाही अनेक वीजपुरवठा खंडित होत होता. अघोषित भारनियमनाची परिस्थितीच निर्माण झाली होती. डोंबिवलीतील वीजहानीचे प्रमाण अवघे साडे आठ टक्के असून ते राज्यात सर्वात कमी आहे. तर विजेचे पैसे भरण्याबाबत डोंबिवलीतील ग्राहक दक्ष असल्याने वीजदेयकाची वसुलीही १०० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाची ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी गंभीर दखल घेतली. त्याबाबत मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या या बैठकीत डोंबिवलीतील वीज यंत्रणेच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर विद्युत यंत्रणा विस्तारासाठी एमआयडीसीपासून बाजीप्रभू चौकापर्यंत सहा किलोमीटर लांबीची नवीन वाहिनी टाकण्याचे ठरले आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्वेचा काही भाग आणि संपूर्ण डोंबिवली पश्चिमेच्या वीजपुरवठय़ासाठी पर्यायी यंत्रणा उभी राहणार आहे. त्याचबरोबर भूमिगत वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास तो शोधण्यासाठी नवीन अद्ययावत यंत्रणा घेतली जाणार आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाड झालाच तर तो लवकरात लवकर शोधणे सोपे होईल. या सर्व कामांसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. याचबरोबर डोंबिवली पश्चिम परिसरात ‘महापारेषण’चे अतिउच्च दाब उपकेंद्र स्थापन करावे असेही प्रस्तावित करण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव ‘महापारेषण’कडे पाठवण्यात येईल.