राज्यात उष्म्यामुळे २० हजार ३६९ मेगावॉट मागणी

राज्यात वाढलेल्या उष्म्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली असून सोमवार २३ एप्रिल रोजी विक्रमी २० हजार ३६९ मेगावॉट विजेचा पुरवठा महावितरणने केला. विजेची मागणी वाढल्याने राज्याच्या काही भागांत काही वेळ भारनियमन करावे लागले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा प्रचंड वाढला आहे. त्याचा परिणाम विजेच्या मागणीवर झाला आहे. मागील आठवडय़ात महावितरणच्या अखत्यारीतील मुंबईची काही उपनगरे व संपूर्ण महाराष्ट्रात विजेची १९ हजार ८१६ मेगावॉटवर पोहोचली होती. सोमवार २३ एप्रिलला राज्यातील वीज मागणीने २० हजारांचा टप्पा ओलांडला व महावितरणने २० हजार ३६९ मेगावॉट विजेचा पुरवठा केला. तर मुंबईची वीज मागणी ३३७५ मेगावॉट होती. अशारितीने मुंबई व महाराष्ट्र मिळून २३ हजार ७३४ मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला.

वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे राज्याच्या काही भागांत दुपारी अर्धा ते एक तास वीजपुरवठा खंडित झाला होता.