फेब्रुवारी महिन्यात आयोजन; २० भाषांमधील लेखिकांचा सहभाग

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात चौथा गेट वे लिटफेस्ट आयोजित करण्यात आला असून यंदाच्या साहित्य महोत्सवाची संकल्पना ‘साहित्यातील महिला शक्ती’ अशी आहे. २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात २० भाषांमधील लेखिका सहभागी होणार आहेत. मल्याळम प्रकाशन संस्था (काक्का) आणि कम्युनिकेशन कन्सल्टन्सी पॅशन ४ कम्युनिकेशन या संस्थांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आसामी, अहिराणी, बंगाली, भोजपुरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, काश्मिरी, कोंकणी, कोसली, मल्याळम, मराठी, मणिपुरी, मैथिली, ओडिसा, पंजाबी, सिंधी, तेलगू, कन्नड आणि तामिळ आदी भाषांमधील मान्यवर साहित्यिक महोत्सवात सहभागी होणार आहेत. साहित्य अकादमीने २०१७ या वर्षी युवा पुरस्काराने गौरविलेल्या सात तरुण लेखिकांचे विशेष सत्र या वर्षीच्या महोत्सवात ठेवण्यात आले आहे. तसेच इंग्रजीतील नवोदित लेखिका, आत्मचरित्रात्मक आणि अन्य विषयांवर लेखन करणाऱ्या लेखिका, अनुवाद या विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्रेही यंदाच्या महोत्सवात होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक मोहन काक्कांदन यांनी दिली. पुस्तक प्रदर्शन, काव्यवाचन, वाचनाच्या बदलत्या सवयी, भाषेची उत्क्रांती, नाटय़क्षेत्रातील महिलांचा सहभाग या विषयांवरही महोत्सवात चर्चा होणार आहे.

प्रादेशिक भाषांमध्ये लेखन करणाऱ्या महिला लेखिकांमधील गुणवत्तेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेणे आणि या लेखिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे   कार्यकारी संचालक जोसेफ अलेक्झांडर तर भारतात भाषिक विविधता असली तरी साहित्याचा धागा समान आहे. या महोत्सवात राष्ट्रीय एकात्मता आणि भाषांचा राष्ट्रीय उत्सव साजरा केला जाणार असल्याचे कार्यकारी संचालक एम सबरीनाथ यांनी सांगितले.

यांचा सहभाग

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा रे (ओडिया), चित्रपटकर्मी अपर्णा सेन (बंगाली), मलिका अमर शेख (मराठी), प्रज्ञा पवार (मराठी), अंजु माखिजा (इंग्रजी), देविका जे (मल्याळम), इंदू मेनन (मल्याळम), कनका हा (कन्नड), कार्तिका व्ही. के. (तामिळ),  नंदिनी सुंदर (इंग्रजी), निरुपमा दत्त (पंजाबी), पॅट्रिसिया मुखीम (मेघालय),  प्रो. चलुपल्ली स्वरूपा राणी (तेलगू), तरन्नुम रियाझ (उर्दू), सुजा सुसान (मल्याळम), तेमसुला आओ (ईशान्य), पद्मश्री (असामी) या लेखिका या वर्षीच्या महोत्सवात सहभागी होणार आहेत.