ज्येष्ठ नागरिक, घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची परवड; जिन्यावरून चढ-उतार केल्याने दमछाक

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत सोमवारी सकाळी अचानक वीज खंडित झाली आणि अनेक लोक उद्वाहनात अडकले. याचा सर्वाधिक फटका ‘डिलिव्हरी बॉय’च्या कामाला बसला. उद्वाहन बंद असल्याने त्यांना उंच इमारतींमधील घरे गाठताना दमछाक झाली.

सकाळच्या धावपळीच्या वेळेतच नेमकी वीज खंडित झाल्याने सोमवारी मुंबईकरांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. मुख्यत्वे उंच इमारतीत राहणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. या तीन ते चार तासांत कामाला जाणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाजारात उतरलेले वृद्ध यांना बराच काळ अडकून राहावे लागले. उद्वाहन बंद असल्याने सकाळच्या वेळेत भाज्या, दैनंदिन वापराच्या वस्तू, खाद्यपदार्थ आदी घरपोच पोहोचवणाऱ्या ‘डिलिव्हरी बॉय’लाही बरीच पायपीट करावी लागली. विक्रोळी येथे खासगी कंपनीत मुलाखतीसाठी निघालेले निखिल शिंदे कामावर जात असतानाच नेमका हा घोळ झाला आणि ते उद्वाहनात अडकले. त्याच वेळी मोबाइल नेटवर्कही खंडित झाल्याने बराच वेळ बाहेरील लोकांशी संपर्क झाला नाही. काही वेळात त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी हालचाल सुरू केली आणि उद्वाहकाचे दरवाजे उघडले. ‘या प्रकारात  ३० ते ४० मिनिटे वाया गेली. शिवाय उद्वाहनातून बाहेर पडताना कपडे खराब झाल्याने पुन्हा तयारी करावी लागली. सध्या नोकरीची अवस्था बिकट आहे त्यात मुलाखतीला जाताना हा प्रकार घडल्याने अधिक मानसिक त्रास सहन करावा लागला,’ असे ते सांगतात.

‘हल्ली संध्याकाळी बाजारात गर्दी होत असल्याने आम्ही सकाळच्या वेळेतच घरातील जीवनावश्यक गोष्टी आणतो. परंतु खरेदीहून येईपर्यंत वीज गेली. आमच्या इथे शक्यतो वीज जात नाही त्यामुळे आम्ही निर्धास्त असतो. परंतु अचानक वीज गेल्याने आठ मजले चढून जायचे कसे असा प्रश्न होता. त्यामुळे वीज येईपर्यंत इमारतीच्या आवरतच थांबावे लागले,’ अशी प्रतिक्रिया लोअर परळ येथे राहणाऱ्या ७० वर्षीय हनुमंत डोईफोडे यांनी दिली. तर ऑनलाइन खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या एका ‘डिलिव्हरी बॉय’ने सांगितले, ‘सकाळच्या वेळेत बऱ्याच ठिकाणाहून नाश्त्याची मागणी असते.

विशेषकरून मोठय़ा सोसायटीमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पदार्थ पोहोचवताना कुठे दहा मजले तर कुठे बारा मजले चढून जावे लागले. त्याचा खूप त्रास झाला,’ हीच अवस्था विविध कंपन्यांमार्फत ऑनलाइन पदार्थ पोहोचवणाऱ्या बहुतांशी ‘डिलिव्हरी बॉय’ची होती. काहीजण उद्वाहकात अडकल्याच्या घटना घडल्या.

सध्या वस्तू घरापर्यंत पोहोचविण्यास परवानगी असल्याने आमचा प्रत्येक डिलिव्हरी बॉय सुरक्षिततेची काळजी घेऊन दारापर्यंत सेवा देतो. सोमवारी वीज खंडित झाल्याने मुलांना घरपोच सेवा देण्यात अडचणी आल्या. त्यात आम्ही भाज्यांची विक्री करत असल्याने ते वेळेत पोहोचवणे गरजेचे असते. त्यामुळे मुलांना मोठमोठय़ा इमारतीमध्ये पायी जावे लागले. अगदी चौदा-सोळा मजल्यांपर्यंत पायपीट करावी लागली. त्यामुळे प्रत्येक डिलिव्हरीनंतर त्यांना काही वेळ आराम दिला जायचा. यामुळे वेळेचे नियोजन बिघडले.

– उदय चोठे, प्रमुख, फ्रेश भाजी.इन