राज्यातील विजेचे दर जास्त असल्याची ओरड करणाऱ्या औद्योगिक वापराच्या वीज ग्राहकांना नव्या रचनेत सूट देऊन महावितरणने खूशखबर दिली आहे. तसेच ३०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांनाही दिलासा मिळाला असून, ३०१ ते ५०० युनिट वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांचे बिल मात्र वाढणार आहे. मुंबईतील रिलायन्सने सर्वच वर्गवारीमध्ये दरवाढ केली असून, टाटा कंपनीने १०० ते ३०० युनिटपर्यंत दरकपात करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. मात्र ३०० युनिटच्या पुढील ग्राहकांना दरवाढ सहन करावी लागणार आहे. त्यामुळे विजेचा कमी वापर करणाऱ्यांना आनंद तर जास्त वीज वापरणाऱ्यांना दरवाढीचा चटका सोसावा लागणार आहे.
विजेचे नवे दर १ जूनपासून लागू होणार आहेत. चालू वर्षांसाठी २०१५-१६ विजेचे दर निश्चित करताना महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाने महावितरणाचा ७.९४ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव मान्य केला नाही. घरगुती वापराच्या १०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांच्या प्रति युनिट दरात १० पैसे कपात करण्यात आली आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिटचा दर ७ रुपये २१ पैसे (सध्याचा दर ७.३९ आहे) असा कमी दर लागू होतील. तर ३०१ ते ५०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांच्या दरात प्रति युनिट ४५ पैसे वाढ झाली आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या रिलायन्स आणि टाटाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. रिलायन्सच्या दरात ५.२ टक्के तर टाटाच्या दरात ३.९ टक्के वाढ झाली आहे. रिलायन्सचा ३०० युनिटपर्यंतचा दर ६ रुपये ५४ पैसे तर ३०१ ते ५०० युनिटपर्यंतचा दर ८ रुपये २० पैसे झाला आहे. टाटा कंपनीचा ३०१ ते ५०० युनिटचा दर ८ रुपये २० पैसे तर ५०१ ते १००० युनिट – १० रुपये ०८ पैसे झाला आहे.
७२ टक्के ग्राहकांना दिलासा
१०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या दरात महावितरणने कपात केल्याने राज्यातील १ कोटी ६६ लाख म्हणजेच ७२ टक्के ग्राहकांना नव्या सूत्रानुसार दिलासा मिळाला आहे. राज्यातील विजेचे दर जास्त असल्याने अन्य राज्यांमध्ये जाण्याच्या विचारात असलेल्या उद्योजकांना बराचसा दिलासा मिळाला आहे. औद्योगिक वापराच्या दरात सरासरी सात ते दहा टक्के कपात झाली आहे.

*शासकीय दवाखाने, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रांना – प्रति युनिट ७ रुपये २० पैसे
(२ रुपये ९२ पैसे दर कमी)
*यंत्रमागधारकांना – दर ७२ पैसे प्रति युनिट कमी. आयटी उद्योग – १ रुपये ३८ पैसे दर कमी
*औद्योगिक वापराच्या दरात सात ते दहा टक्के कपात

दरकपातीची तांत्रिक चलाखी
राज्य वीज नियामक आयोगाची वीजदरवाढ कमी वाटत असली, तरी प्रत्यक्षात कितीतरी अधिक दरवाढ लादण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इंधन समायोजन शुल्क जूनमध्ये कमी झाले, मात्र एप्रिलचे शुल्क प्रमाण मानून दरवाढीपूर्वीच मूळ वीजदर फुगविण्यात आला. त्यामुळे लागू होणाऱ्या वाढीव विजेच्या दराची टक्केवारी कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात विजेची दरवाढ १० ते १५ टक्के आहे, असे अभ्यासक विवेक वेलणकर यांनी सांगितले.
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना एप्रिलमध्ये इंधन अधिकार आकार प्रतियुनिट ५० पैसे होता. हे शुल्क सध्या २८ पैसे आहे. १०१ ते ३०० व ३०१ ते ५०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांसाठी हे शुल्क एप्रिलमध्ये अनुक्रमे १.१५ रुपये व १.५५ रुपये होते. हे शुल्क सध्या प्रतियुनिट ४३ व ६२ पैसे इतके झाले आहे. आयोगाने एप्रिलमधील इंधन अधिभार धरला आहे. त्यामुळे मूळ वीजदर वाढवूनच नवी दरवाढ केली आहे. ही फसवणूक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

महावितरण
१०० युनिटपर्यंत – प्रति युनिट ३ रुपये ७६ पैसे
१०१ ते ३०० युनिट – ७ रुपये २१ पैसे
३०१ ते ५०० युनिट – ९ रुपये ९५ पैसे
५०१ ते १००० युनिट – १२ रुपये ५०पैसे

रिलायन्स
१०० युनिटपर्यंत – ४ रुपये ७९ पैसे (५ टक्के वाढ)
१०१ ते ३०० युनिट – ६ रुपये ५४ पैसे (तीन टक्के वाढ)
३०१ ते ५०० युनिट – ८ रुपये २० पैसे (११ टक्के वाढ)
५०१ ते १००० युनिट – १० रुपये ०८ पैसे (नऊ टक्के वाढ)

टाटा कंपनी
१०० युनिटपर्यंत – २ रुपये ०५ पैसे (१७ टक्के कपात)
१०१ ते ३०० युनिट – ४ रुपये २१  (सात टक्के कपात)
३०१ ते ५०० युनिट – ८ रुपये ४२ पैसे (तीन टक्के वाढ)
५०१ युनिटपेक्षा जास्त – १० रुपये ०३ पैसे. (तीन टक्के वाढ)