राज्याच्या ऊर्जा मंत्रालयात पुन्हा एकदा खाजगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. वीजचोरी रोखणे आणि वसुली वाढविण्यासाठी आता खाजगी ठेकेदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला असून ४२ टक्के पेक्षा अधिक हानी असलेल्या १४६९ फिडवर हे ठेकेदार नेमण्यात येणार आहेत. वीज कंपन्यांतील ही कामे प्राधान्याने बेरोजगार युवकांना देण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. मुंबईत कधीही विजेचे संकट निर्माण होऊ नये यासाठी ८०० मेगाव्ॉट क्षमतेची वीजवाहिनी टाकण्याचे काम डिसेंबपर्यंत पूर्ण केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 राज्यात ज्या फिडरवर वीजचोरी अधिक व वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे अशा फिडरवरील हानी कमी करण्यासाठी व ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी फिडर फ्रॅन्चायझी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या ५ हजार ६४७ फिडर असून त्यापैकी ४ हजार १७८ फिडर भारनियमनमुक्त आहेत. मात्र ई,एफ आणि जी गटात मोडणाऱ्या १४६९ फिडरवर ४२ टक्के पेक्षा अधिक वीज आणि वाणिज्यिक हानी असून तेथे देखभाल व वीज चोरी पकडणे, थकबाकी आणि वीजचोरी आढळल्यास मिटर काढून घेणे, वीज जोडणी बंद करणे,बील वाटप करणे आदी कामे फॅन्चायझीवर सोपविण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात येणार असून सुशिक्षित बेरोजगार तरूणांनाच ही कामे प्राधान्याने दिली जाणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. ही योजना प्रथम एक वर्षांसाठी अंमलात आणण्यात येणार असून त्यानंतर दोन- दोन वर्षांचे करार केले जाणार आहेत. ठेकेदारांना महावितरणच्या प्रचलीत धोरणानुसार मोबदला दिला जाईल.