तुकाराम फडतरे यांच्या मृत्यूला उखडलेले पेव्हर ब्लॉक कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. कळवा पोलिसांनी त्याच दिशेने तपास सुरू केल्यामुळे ठाणे महापालिकेतील अभियंता विभाग अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
फडतरे यांना सोमवारी रात्री ठाणे शहर परिमंडळ – १ मधील ‘मोबाइल स्ट्रायकिंग फोर्स’चे काम सोपविण्यात आले होते. मंगळवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास फडतरे दुचाकीवरुन ऐरोली येथील घरी निघाले होते. ठाणे-बेलापूर मार्गाने ऐरोलीच्या दिशेने जात असताना विटावा पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या दहा चाकी ट्रकची जोरदार धडक बसली. त्यात ते जागीच ठार झाले. पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालक मुन्ना सुरामन तुरी (२८, रा. डहाणू) याला अटक केली आहे. दरम्यान, हा अपघात उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे झाला असावा, अशी प्राथमिक माहीती पोलीस तपासात पुढे आली आहे. विटावा पुलाजवळ दोन्ही बाजूंचा रस्ता सिमेंट काँक्रीट तसेच पेव्हर ब्लॉकने तयार करण्यात आला आहे. पावसाळ्यात पेव्हर ब्लॉक उंच-सखल झाले असून काही ठिकाणी ते उखडले गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन वाहने नेताना चालकांना कसरत करावी लागते. उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे  ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि फडतरे यांच्या दुचाकीला धडक बसली. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश निलेवाड यांनी या माहितीला दुजोरा दिला. पेव्हर ब्लॉक उखडल्यामुळे हा अपघात झाला आहे का, याची आणखी माहिती घेतली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुकाराम फडतरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. थोरल्या मुलीचे लग्न झाले असून दुसऱ्या मुलीने पदवी घेतली आहे. तर मुलगा बारावीमध्ये शिकत आहे. तुकाराम हे घरातले एकमेव  कमावते होते.