News Flash

हलगर्जी अधिकाऱ्याकडेच पनवेलची ‘ऊर्जा’

दोन वर्षांपूर्वी पनवेलमध्ये वीज महावितरण कंपनीतील अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे एक अपघात झाला होता.

| March 8, 2015 04:26 am

दोन वर्षांपूर्वी पनवेलमध्ये वीज महावितरण कंपनीतील अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे एक अपघात झाला होता. या अपघातात एका तरुणाला प्राण गमवावे लागले होते. अपघाताला कथितरित्या जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. मात्र या अधिकाऱ्याला पुन्हा पनवेलचीच जबाबदारी देण्यात आली आहे. मृत तरुणाच्या वारसांना दोन वर्षांनंतरही नुकसानभरपाई मिळालेली नाही.
२०१३च्या फेब्रुवारी महिन्यात खारघर येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. त्या वेळी काम करताना लक्ष्मण भद्रय़ा राठोड या मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद केली, मात्र संबंधितांवर गुन्हा दाखल केला नाही. महावितरणने व पोलिसांनी विद्युत निरीक्षकाचा अहवाल मागविला. त्यात या परिसराचे उपकार्यकारी अभियंता सुभाष राठोड यांना दोषी ठरविले. या अहवालानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. महावितरण कंपनीने प्रकरण शांत होईपर्यंत सुभाष राठोड यांची बदली दुसरीकडे केली. मात्र दोन वर्षांनंतर पुन्हा त्यांना पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसराचे वीज नियंत्रणाचे काम देण्यात आले आहे.

महावितरणची टोलवाटोलवी
महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सतीश करपे यांना विचारले असता ते म्हणाले, नुकसानभरपाई व बदलीचा प्रस्ताव हे दोनही अधिकार अधीक्षक अभियंता यांना दिलेले आहेत. खारघर येथे झालेल्या अपघातप्रकरणी मृताच्या वारसांना भरपाई मिळाली नाही हे खरे आहे. मात्र या अपघातामध्ये महामार्गाच्या बांधकामाचा ठेका देणारे संबंधित प्राधिकरण जबाबदार आहे. त्यांच्याशी आमच्या विभागाने अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. लवकरच वारसदारांना भरपाई देण्यात येईल असे वाशी विभागाच्या महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अरुण थोरात यांनी सांगितले.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब का लावला याची चौकशी सुरू आहे. या अपघातास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंत्राटदार व महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत. कायद्यापुढे कोणीही मोठे नाही.
– शेषराव सूर्यवंशी , सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल

अभियंता संघटनेचा प्रतिनिधी असल्याचा कधीही गैरफायदा घेतला नाही. पनवेलमध्ये बदली करावी यासाठी कधीही वरिष्ठांकडे प्रयत्न केले नाहीत. उलट याआधी दोन वेळा मला पनवेल सबडिव्हिजनला बदली देण्यात आली होती. माझ्या कार्यकाळात मी कोठेही दीड ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेले नाही.
– सुभाष राठोड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 4:26 am

Web Title: powergrid panvel
Next Stories
1 वेळुकर रुजू
2 सईशी गप्पा आज ‘झी चोवीस तास’वर
3 तरुणीचे अपहरण करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
Just Now!
X