डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई संच

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : डेंग्यूच्या साथीला कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडिस’ डासांची टाळेबंद इमारत आणि प्रतिबंधित क्षेत्रातील करोनाबाधिताच्या घरातील उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करणारे कर्मचारी आदींप्रमाणेच पीपीई संचचा वापर करावा लागणार आहे. डास नियंत्रण खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पावसाळा सरण्याच्या बेतात असून त्यानंतर हिवाळा सुरू होणार आहे. त्याआधी सुरू होणारा ऊन-पावसाचा खेळ डेंग्यूची साथ पसरवणाऱ्या डासांच्या उत्पत्तीस पोषक असतो. त्यामुळे एडिसच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेऊन डासांच्या अळ्या नष्ट करण्यात येत आहेत. घरामधील शोभेच्या झाडांखाली ठेवलेल्या थाळ्या, वाडगे, फुलदाणी, साठवून ठेवलेले पाणी आदींमध्ये एडिसची उत्पत्तीस्थाने असतात. त्यांचा शोध घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरामध्ये प्रवेश करावा लागतो.

करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईमधील ६०९ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत, तर ९,५२७ इमारती टाळेबंद आहेत. प्रतिबंधित क्षेत्र आणि टाळेबंद इमारतींमधील सामायिक भागात डास नियंत्रण खात्यातील कर्मचारी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे काम करीत आहे. मात्र करोनाबाधित रुग्णाचे घर, मजला वा आसपासचा परिसर सोडून हे काम करण्यात येत आहे. आता इमारतीत १० अथवा दोनपेक्षा अधिक मजल्यांवर करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण इमारत टाळेबंद करण्यात येत आहे. पूर्वी इमारत अंशत: टाळेबंद होत होती. आता ती पूर्णपणे टाळेबंद होत आहे. एडिस डासांची उत्पत्तीस्थाने घरामध्ये आढळून येतात. त्यामुळे घरात जाऊन त्यांचा शोध घ्यावा लागतो.

टाळेबंद इमारत वा प्रतिबंधित क्षेत्रातील करोनाबाधित रुग्णाच्या घरात प्रवेश करून हे काम करणे संबंधित कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे बाधित, संशयित रुग्णांच्या घरात डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई संच परिधान करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

पीपीई संचामुळे कामामध्ये थोडे अडथळे येऊ शकतात. परंतु कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ते महत्त्वाचे आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

डेंग्यूचे रुग्ण आढळलेली टाळेबंद इमारत अथवा प्रतिबंधित क्षेत्रातील करोनाबाधिताच्या घरात डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बाधितांच्या घरात जाताना कर्मचाऱ्यांना पीपीई संच परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

-राजन नारिंग्रेकर, प्रमुख कीटक नियंत्रण अधिकारी