राज्यभरात करोनाचे जेवढे रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी सर्वात जास्त हे मुंबईतील आहेत. त्यातही वरळी, प्रभादेवी  येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत रविवापर्यंत ४३३ रुग्ण आढळले असून वरळीपाठोपाठ वाळकेश्वर, मलबारहिल, ग्रँटरोड, अंधेरी, पार्ले येथे मोठय़ा संख्येने रुग्ण आढळले आहेत. या भागांत २० पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा ७०० पलीकडे गेलेला असून त्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. पालिकेने मुंबईतील २४ विभागांतील रुग्णांची आकडेवारी जाहीर केली असून त्यात चार विभाग सर्वात धोकादायक आढळले आहेत.

रविवारी लालबाग परिसरात आणखी एक रुग्ण आढळला असून लालबाग बाजारात राहणारा हा ३५ वर्षांचा युवक एका विमान कंपनीत कामाला आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.

अंधेरी गुंदवली परिसरात एका वयोवृद्ध जोडप्याला लागण झाली असून त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी परदेशातून आला होता.

धारावीत पॅथॉलॉजी कर्मचाऱ्याला लागण

धारावी परिसरात आज आणखी एक रुग्ण सापडला. मदिना नगर परिसरात राहणारा २१ वर्षांचा हा पुरुष ऐरोली येथे पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत कामाला आहे. त्याची पत्नी देखील दुसऱ्या ठिकाणी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत कामाला आहे. तो २४ मार्चपर्यंत कामावर जात होता. २९ मार्चला त्याला लक्षणे दिसू लागली. त्याच्या घरातील पाचजणांचे विलगीकरण केले आहे. त्याच्या संपर्कातील १७९ जणांचीही तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

धारावी परिसरात आतापर्यंत ५ रुग्ण आढळले असून त्यांच्या संपर्कातील तब्बल ५७ जण हे अति धोकादायक म्हणजेच अतिनिकट संपर्कातील आहेत.

नवी मुंबईत दुसरा मृत्यू; बाधितांची संख्या २८

नवी मुंबई शहरात करोनाचे रुग्ण वाढत असून शहरात करोनामुळे दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. शहरातील करोनाच्या बाधितांची संख्या २८ वर पोहचली आहे.

रविवारी शहरात एकूण तीन  रुग्णांची भर  पडली आहे. मृत्यू झालेले ज्येष्ठ नागरीक हे नेरुळ सेक्टर २३ येथील रहिवाशी असून ते ७२ वर्षांचे होते.  त्यांची करोना चाचणी होकारात्मक आली आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांमध्ये घणसोली सेक्टर ९ मधील एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. नेरूळमधील सेक्टर  २८ मधील युवक करोनाबाधित आढळला होता. त्याच्या आई व मुलासहीत आज वडिलांनाही करोना झाल्याचे निष्पन्न झाले असून एकाच घरातील चारजण करोनाबाधित झाले आहेत. शहरातील १५ जणांचे करोना तपासणी अहवाल येण्याचे बाकी आहेत. ११२४ जणांचे अलगीकरण केले आहे.

कळवा, मुंब्रा, दिव्यात वाहतुकीस बंदी

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कळवा, मुंब्रा आणि दिवा या तिन्ही भागातील मुख्य रस्ते तसेच गल्लीबोळातील रस्त्यांवर दुचाकी, रिक्षा, कार आणि प्रवासी वाहनांना वाहतुकीस पुर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रविवारी घेतला. याची अंमलबजावणी रविवार सायंकाळपासूनच सुरू  झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी  वाहने, शासकीय-निमशासकीय वाहने, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची खासगी  वाहने, वैद्यकीय सेवेतील वाहने, प्रसारमाध्यमे,ऑन कॉल रिक्षा आदींना हा  निर्णय लागू राहणार नाही.

जास्त रुग्णसंख्येचे विभाग

जी दक्षिण : वरळी, प्रभादेवी — ५८

डी : मलबार हिल, वाळकेश्वर, नानाचौक — ३१

के पश्चिम : अंधेरी, वर्सोवा, पार्ले पश्चिम — २५

के पूर्व : अंधेरी, मरोळ, सहार, गुंदवली — २४

ई : भायखळा, डोंगरी — १९

पी उत्तर : मालाड — १८

एच पूर्व : बांद्रा, सांताक्रूझ, खार — १८

कमी रुग्णसंख्येचे विभाग

बी : माझगाव -२;  एफ दक्षिण : शिवडी,

नायगाव – ४;  आर मध्य : बोरिवली, कांदिवली – ४

मृतांचे अहवाल तीन दिवसांनी

मुंबईतील रविवारच्या आठ मृतांपैकी तीन रुग्णांचे मृत्यू ३ एप्रिल पूर्वी  झाले. मात्र त्यांचा अहवाल पालिकेने तब्बल तीन दिवसांनंतर जाहीर केलो. करोनाबधिताच्या मृतदेहाबाबत विशेष काळजी घ्यावी लागत असताना पालिका ही माहिती उशिराने देत असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.