नमिता धुरी

दादरच्या मैदानात शांततेत ‘थरार’

ढोलताशांचा कडकडाट, प्रोत्साहनपर शिट्टय़ा-आरोळ्यांमधून होणारा गलबलाट असे दहीहंडी सरावादरम्यानही दिसणारे नेहमीचे वातावरण दादरच्या ‘मेजर रमेश दडकर मैदाना’तील तालमीच्या ठिकाणी दिसत नाही. इथे फक्त शिट्टीचे आवाज ऐकू येते. बाकी नीरव शांतता. पण त्या शिट्टीच्या इशाऱ्यावरच थरावर थर रचले जातात. त्यात शिस्त असते. हा अभिनव गोविंदा आहे, नयन फाऊंडेशनचा. महाराष्ट्रातील पहिला दृष्टिहीन गोविंदा पथकाचा.

सध्या मुंबईच्या विविध भागांत गोविंदा पथकांच्या तालमींना सुरुवात झाली आहे. त्यात नयन फाऊंडेशनचे गोविंदा पथक खासच. २०१३ साली बोरिवलीत दहीहंडीनिमित्त एका सामाजिक उपक्रमासाठी नयन फाऊंडेशनच्या मुलांना बोलावण्यात आले होते. तिथे कोणत्याही प्रकारचा सराव किंवा सुरक्षिततेची उपाययोजना नसताना या मुलांनी तीन थर रचले आणि उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. यावरूनच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोन्नलगर देवेंद्र यांना गोविंदा पथकाची कल्पना सुचली.

देवेंद्र स्वत अंशत अंध आहेत. ते नवमहाराष्ट्र गोविंदा पथकात दरवर्षी आवर्जून हंडी फोडायला जात. आपण जर हंडी फोडण्याचा आनंद घेऊ शकतो तर आपल्या इतर दृष्टिहीन मित्रांना हा आनंद का मिळू नये, असा विचार त्यांच्या मनात आला. याच प्रेरणेतून २०१४ साली दृष्टिहीन मुलांच्या आणि २०१७ साली दृष्टिहीन मुलींच्या गोविंदा पथकाला सुरुवात झाली. इतर सर्वसामान्य गोविंदा उंचावरून पडून हात-पाय मोडून घेत असताना नयन फाऊंडेशनचे गोविंदा मात्र एकदाही न कोसळता तीन ते चार थर सहज लावतात. आतापर्यंत एकूण ९० ते ९५ ठिकाणी या मुलांनी थर लावले आहेत. त्यांचा सर्व सराव हा कोणत्याही गाण्यांशिवाय फक्त कानावर पडणाऱ्या शिट्टय़ांच्या आवाजावर अवलंबून असतो. त्यामुळे ही मुले जिथे कुठे हंडी फोडायला जातात तिथे त्यांच्यासाठी चिडीचूप शांतता ठेवली जाते आणि मगच थर रचले जातात. त्यांच्या या शिस्तीचे आणि उत्साहाचे इतर गोविंदांनाही कौतुक वाटते.

या संदर्भात एक आठवण संस्थेचे सचिव शार्दूल म्हाडगुत यांनी सांगितली. २०१४ साली त्यांनी ठाण्यात हंडीला पहिल्यांदा थर लावले. ते इतके शिस्तबद्ध आणि अचूक होते की त्या वेळी बक्षीस घेऊन जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून माझगाव ताडवाडीच्या गोविंदा पथकाने नयन फाऊंडेशनला टाळ्यांची सलामी दिली होती. या पथकामुळे दृष्टिहीनांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. याचेच उदाहरण म्हणजे देवेंद्र यांच्या एका मित्राचे वडील त्याला नेहमी देवेंद्र यांची संगत सोडण्यास सांगत असत. पण त्यांनी एक दिवस देवेंद्र यांच्या पथकाचे टीव्हीवर कौतुक होताना पाहिले आणि याबाबत स्वतहून फोन करून शुभेच्छा दिल्या.

पूरग्रस्तांना मदत

या पथकातल्या गोविंदांमध्ये नुसताच उत्साह नाही तर सामाजिक भानही तितकेच आहे. त्यामुळे या वर्षी मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतील १०टक्के रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना देण्याचा निर्धार या मुलांनी केला आहे.