प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
मुंबईत महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असून या गुन्हय़ांतील अटक केलेले आरोपी न्यायालयात निर्दोष सुटण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१२-२०१३ या वर्षांत ९३ टक्के गुन्हेगार निर्दोष सुटले आहेत. ‘प्रजा फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मुळातच कमी होते. २०११-२०१२ वर्षांत हे प्रमाण १० टक्के होते. परंतु २०१२-२०१३ या वर्षांत हे प्रमाण ३ टक्क्यांनी घसरून ७ टक्के झाले आहे. खून, बलात्कार, अपहरण आदी गंभीर गुन्हय़ांत अटक केलेले ९३ टक्के आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटल्याची माहिती प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात देण्यात आली आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या गुन्हय़ातही वाढ होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षांत बलात्काराच्या १८७ घटना घडल्या होत्या तर २०१२- २०१३ मध्ये २९४ घटना घडल्या आहेत. त्यात ५४ टक्के वाढ झाली आहे. विनयभंगाच्या घटनांमध्येसुद्धा ४३ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षांत विनयभंगाच्या ५५४ घटना घडल्या होत्या तर चालू वर्षांत ७९३ घटना घडल्या आहेत.
  मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बळ अत्यंत कमी आहे. मुंबई पोलीस दलात मंजूर पदाच्या १४ टक्केपदे भरलीच गेलेली नाहीत. तसेच मुळात मंजूर पदेसुद्धा आवश्यकतेपेक्षा खूप कमी असल्याचे प्रजाने म्हटले आहे. मुंबईत पोलिसांची ४१,३९८ पदे मंजूर असून १७६३ जागा भरल्या गेलेल्या नाहीत. हवालदारांची ३३,११० पदे मंजूर असून प्रत्यक्षात २९,८११ पदे भरण्यात आली आहेत. उपनिरीक्षकांची ३,१२५ पदे मंजूर असून प्रत्यक्षात केवळ १,३१९ पदे भरण्यात आली आहेत.