राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये मुंबईतील भाजपा आमदारांपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या तीन आमदारांच्या यादीत भाजपाच्या एकाही आमदाराच्या नावाचा समावेश नाही. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार असल्याचे प्रजाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल असून तिसऱ्या स्थानी मालाडचे आमदार अस्लम रमझान अली शेख यांचा समावेश प्रजाने आपल्या अहवालात केला आहे.

विधानसभेमध्ये शिवसेनेच्या सुनील शिंदेंनी सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले. तर घाटकोपरचे भाजपा आमदार राम कदम यांनी पाच वर्षांच्या कालावधीमध्ये स्वत:च्या मतदारसंघासंदर्भात एकही प्रश्न विचारलेला नाही. हजेरीच्या बाबतीतही राम कदम शेवटच्या चार आमदारांमध्ये आहेत. इतकेच नाही तर अहवालामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपापेक्षा काँग्रेसच्या आमदारांची कामगिरी चांगली असल्याचे दिसून येत आहे.

प्रजा फाउंडेशनने गुरुवारी आमदारांच्या कामगिरीचा आढवा घेणारा २०१८-१९ या वर्षातील अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये मागील वर्षापेक्षा या वर्षी आमदारांनी समाधानकारक कामगिरी केल्याचे दिसून आले.

मुंबईतील आमदारांचे सरासरी गुणांमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये मुंबईतील आमदारांच्या कामगिरीबद्दल ६४ टक्के जनतेने समाधान व्यक्त केले आहे. हाच आकडा मागील वर्षी ५९ टक्के इतका होता. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सुनील शिंदेंना ७९.३८ टक्के गुण देण्यात आले आहे तर दुसऱ्या स्थानावरील अमीन पटेल यांना ७९.२९ टक्के गुण आहेत. तिसऱ्या स्थानवारील अस्लम शेख यांनाही प्रजाच्या अहवालात ७९.२९ टक्के गुण मिळाले आहेत.

सत्तेत नसलेल्या काँग्रेस आमदारांनाही चांगली कामगिरी केल्याचे चित्र या अहवालातून समोर आले आहे. काँग्रेच्या पाच आमदारांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण देण्यात आले आहे. मागील वर्षीपेक्षा या वर्षी आमदार आपल्या मतदारसंघामधील नागरिकांसाठी अधिक वेळा उपलब्ध असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आमदारांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराचे प्रमाणही कमी झाले आहे. मागील वर्षी ३८ असणारे भ्रष्टाचाराचे प्रमाण आता १४ टक्क्यांवर आले आहे. मुंबईतील एकूण ३२ आमदारांपैकी १३ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.