प्रकाश आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका

रिपब्लिकन पक्षाचे विविध गट माझ्या नेतृत्वाखाली एकत्र आले तरी,  एकजातीय राजकारण मला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. नवीन पिढी जातीपातीच्या पलिकडचा विचार करते, त्यामुळे यापुढचे राजकारणही जातमुक्त असले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर पुन्हा प्रकाशझोतात आलेले प्रकाश आंबेडकर मुंबई मराठी पत्रकार संघाने शुक्रवारी आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.

बदललेली ग्रामीण अर्थव्यवस्था कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही. विकासाचा आराखडा नाही.  संधी म्हणून दिलेले आरक्षण नकारात्मतेकडे घेऊन जात आहे. आरक्षण हे विकासाचे साधन मानले गेले ते चुकीचे आहे. समाजा-समाजातील संवाद तुटत गेला. हा संवाद पुन्हा सुरु करण्यासाठी इतिहासात डोकवावे लागले. भीमा कोरेगाव हे त्यातील प्रकरण आहे. स्वतची ओळख शोधण्याचा तो प्रयत्न आहे. आम्ही इतिहास घडविला हे त्यांना सांगायचे आहे. अस्पृश्यता हे पेशवाईतील अन्यायाचे प्रतिक, पेशवाईने अलुतेदारांवरही तसाच अन्याय केल्याचे आंबेडकर यांचे म्हणणे आहे.

भीमा कोरेगावचे निमित्त करुन महाराष्ट्रात जातीय दंगल घडविण्याचा काही शक्तींचा कट होता, मात्र तसे काही घडले नाही. महाराष्ट्रातील जनतेने प्रगल्भता दाखविली असे ते म्हणाले. भीमा कोरेगाव प्रकरणाचा संबंध नक्षलवाद्यांशी जोडून त्यानंतर झालेल्या बंद आंदोलनाला बदनाम करण्याचा पोलिसांचा डाव आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला. आपण िहसेचे कधीच समर्थन करणार नाही, परंतु १ जानेवारीला ज्यांच्यावर हल्ले झाले, ज्यांचे नुकसान झाले, ते कोणत्या स्वरुपात व्यक्त होतील हे सांगता येणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी सरकारला दिला.

रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याविषयही केलेल्या आवाहनाचा मुद्दा पुन्हा छेडला असता, प्रकाश आंबेडकर यांनी ऐक्य या संकल्पानेला विरोध असल्याचे सूचित केले. मला राजकारणापेक्षा समाजात बदल घडवून आणणे महत्त्वाचे वाटते असे ते म्हणाले.

‘वाजपेयी विश्वासार्ह नेतृत्व, मोदींची प्रतिमा स्वच्छ’

राजकारणात विश्वासार्ह नेतृत्वाची गरज असते. अलीकडे फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे विश्वासार्ह नेतृत्व होते. पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात सत्य बोलण्याची हिंमत त्यांच्यात होती. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अजून तरी भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मोदींची स्वच्छ प्रतिमा असल्याने काँग्रेस त्यांना राजकीय आव्हान देऊ शकत नाही, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.