दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस पाडण्यात आल्याचा वाद आता आणखी भडकणार आहे. भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. आंबेडकर भवन उद्ध्वस्त करण्यामागे दोन गटांमधला वाद आहे, असे जाहिररीत्या विधान करण्याची हिंमत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखवावी, मग मुख्यमंत्री म्हणून माझा संघर्ष त्यांच्याशीच असेल. आगामी काळात ‘वर्षा’ बंगल्यावर बुलडोझर फिरविण्यास मी देखील मोकळा असेन, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

पीपल्स इंप्रूव्हमेंट ट्रस्टने पुनर्विकासाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेली ऐतिहासिक वास्तू तोडल्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. आंबेडकरी चळवळ संपविण्याचा डाव उधळून लावण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यानुसार बुधवारी विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीवेळी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आंबेडकर भवनाला उद्ध्वस्त करणारे राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टमधील त्यांच्या साथीदारांच्या अटकेच्या मागणीसाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश देखील दिले होते. मात्र, अजूनही गायकवाड आणि त्यांचे साथीदार मोकाटच आहेत, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी येत्या १५ जुलैला मुंबईत विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. आंबेडकरी व डाव्या-पुरोगामी पक्ष-संघटनांच्या वतीने जिजामाता उद्यान येथून विधान भवनावर काढण्यात येणाऱ्या राज्यव्यापी मोर्चाचे नेतृत्व भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर करणार आहेत.