लोकसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे विविध गट जागे होऊ लागले आहेत. भारिप-बुहजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या आधीच महाराष्ट्र लोकशाही आघाडीची स्थापना करुन लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे जाहीर केले आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षानेही निवडणुकीची तयीरी सुरु केली आहे. इंदू मिलच्या आंदोलनामुळे प्रकाश झोतात आलेले रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मात्र सध्या थांबा आणि पहा अशी भूमिका घेतली आहे. दलित-बहुजन मतदारांना आकर्षित करण्यासाठी आंबेडकर व आठवले यांनी शक्तीप्रदर्शनाचीही जोरदार तयारी सुरु केली आहे.
राज्यातील सर्वच लहान-मोठय़ा राजकीय पक्षांनी आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कॉंग्रेसबरोबरची बोलणी फिसकटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी २० हून अधिक छोटय़ा-मोठय़ा संघटनांची मोट बांधून महाराष्ट्र लोकशाही आघाडीची स्थापना केली आहे. आघाडीच्या वतीने त्यांनी आता राज्यभर सभा-मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. या महिनाअखेपर्यंत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व कोकणमध्ये रायगड व सिंदुधुर्ग जिल्ह्य़ात सभा होणार आहेत. लोकशाही आघाडीच्या वतीने २ ऑक्टोबरला मुंबईत मंत्रालयावर एक लाखाचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाच्या प्रवक्तया डॉ. उज्वला जाधव यांनी दिली. प्रकाश आंबेडकरांचे मुंबईतील हे शक्तीप्रदर्शन असेल असे मानले जात आहे.
शिवसेना-भाजपकडून मानसन्मान मिळत नाही, अशी तक्रार असली तरी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने महायुतीसोबतच जाण्याचे अजून तरी ठरविले आहे. गेल्या महिन्यात त्यांनीही विभागवार कार्यकर्त्यांची शिबिरे घेऊन निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या वेळी ३ ऑक्टोबरला औरंगाबाद येथे पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानिमित्त आठवले यांची शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु आहे. त्या निमित्ताने आंबेडकर यांच्याप्रमाणेच आठवले यांचाही दलित-बहुजन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.  इंदू मिलच्या आंदोलनानंतर देशभर प्रसिद्धिीच्या झोतात आलेले आनंदराज आंबेडकर यांनी मात्र सध्या थांबा आणि पहा अशी भूमिका घेतली आहे. रिपब्लिकन सेना ही सामाजिक संघटना आहे, त्यामुळे निवडणुकांच्या राजकारणात सध्या तरी उतरायचे नाही, असे आम्ही ठरविले असल्याची माहिती  आनंदराज यांनी दिली.  २१ सप्टेंबरला रिपब्लिकन सेनेच्या राज्य कार्यकारिणीची व जिल्हाध्यक्षांचे मुंबईत विचारमंथन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात सर्व विषयांवर चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय भूमिका काय घ्यायची यावर विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.