नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न

भीमा कोरेगावमधील घटनेनंतर आंदोलनाची सारी सूत्रे आपल्या हाती घेत महाराष्ट्र बंदची दिलेली हाक आणि यशस्वी झालेला बंद यातून रामदास आठवले यांना शह देत दलित चळवळीत आपले नेतृत्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

दलित चळवळीतील नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. या नेत्यांना एकत्र आणण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. १९८९ व १९९८ मध्ये ते यशस्वी झाले होते. पण हा प्रयोग फार दिवस टिकला नाही. राज्यातील दलित चळवळीत सध्या रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या दोनच नेत्यांची ताकद आहे. हे दोन्ही नेते परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या पक्षांशी वेळोवेळी मैत्री केलेले रामदास आठवले हे सध्या भाजपच्या बरोबर असून, केंद्रात भाजपमुळे त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे.

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर दलित समाजात उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेच्या पाश्र्वभूमीवर सारी सूत्रे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या हाती घेतली. महाराष्ट्र बंदची हाक देत समाजातील नाराजीला वाट करून दिली. महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने त्याचे सारे श्रेय प्रकाश आंबेडकर यांना गेले.

आजच्या आंदोलनात दलित चळवळीतील सारे गटतट रस्त्यावर उतरले होते. रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री असल्याने त्यांच्यावर आता मर्यादा आल्या आहेत. ही संधी साधत प्रकाश आंबेडकर यांनी आठवले यांच्यावर कुरघोडी केली. बंद यशस्वी झाल्यावर आठवले यांनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असला तरी दलित समाजात आंबेडकर यांच्याबद्दल चांगली प्रतिमा तयार झाली.

दोन वर्षांपूर्वी दादरच्या आंबेडकर भवनची इमारत पाडण्यात आल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी या विरोधात आवाज उठविला होता. तेव्हाही आंदोलनाची सारी सूत्रे आंबेडकर यांच्याकडे होती. भीमा कोरेगावनंतर मात्र आंबेडकर यांनी आपले नेतृत्व पुन्हा प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. भाजपच्या मदतीने केंद्रात राज्यमंत्री झालेल्या रामदास आठवले यांच्याबद्दल दलित समाजात काहीशी नाराजीची भावना आहे. गेल्याच वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती करूनही आठवले यांच्या पक्षाच्या पदरी अपयशच आले होते.

प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून समान अंतर ठेवण्यावर भर दिला आहे. अगदी अलीकडे त्यांनी गुजरात निवडणुकीच्या काळात संविधान बचावासाठी ठिकठिकाणी जाऊन प्रचार केला, पण काँग्रेसबरोबर जाण्याचे टाळले होते.

भाजप किंवा काँग्रेस यापैकी कोणताच पर्याय न स्वीकारण्याची त्यांची भूमिका निवडणुकीच्या राजकारणात त्यांना अडचणीची ठरते. कारण अकोला या त्यांच्या पारंपारिक लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि आंबेडकर अशा तिरंगी लढतीत भाजपचा फायदा होतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकर मात्र तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.