कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरिता बोलाविण्यात येणाऱ्या बैठकांना उद्योगपती येत नाहीत. म्हणून आपणच कारखान्यांमध्ये जाऊन कामगारांशी चर्चा करतो. कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भात मनमानी करणाऱ्या उद्योगपतींना सरकार काय असते ते दाखवून देऊच, पण त्यांना अशा बैठकांना येण्यास भाग पाडू, असा सज्जड दमच कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी गुरुवारी विधानसभेत दिला.
कामगार कायद्यातील सुधारणांसाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावरील चर्चेत कामगारांच्या प्रश्नांकडे मालकवर्गाकडून दुर्लक्ष केले जाते, असा सूर विरोधी सदस्यांनी लावला होता. आपण मंत्री झाल्यापासून कामगारांना न्याय देण्याकरिता धडपडत असतो, पण मालक किंवा उद्योगपतींकडून प्रतिसाद दिला जात नाही, अशी खंत मेहता यांनी व्यक्त केली. या संदर्भात काही दाखले देत कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरिता आपण स्वत:च कारखान्यांच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणाऱ्या कामगारांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
कामगारमंत्र्यांना अशी वागणूक दिली जात असल्यास कामगारांचे प्रश्न कसे सुटणार, असा सवाल शेकापचे गणपतराव देशमुख यांनी केला. तेव्हा आपण उद्योगपतींना सरळ करू, असा सज्जड दमच मेहता यांनी दिला.